अमृतपाल खासदार होऊन ६ महिने झाले परंतु अद्याप कुठला अधिकार मिळाला नाही. खासदाराकडे ५ कोटींचा फंड असतो परंतु त्यातला एक रुपयाही खर्च करता आला नाही. ४-५ महिन्यापासून फक्त अर्ज देत आहेत. कमीत कमी १ स्वीय सहाय्यक नियुक्त केला असता जो खासदाराकडे येणाऱ्या लोकांच्या समस्या जाणून घेईल परंतु तेदेखील झाले नाही. पंजाबच्या खडूर साहिब जागेवरून खासदार असलेले अमृतपाल सिंग यांचे वडील तरसेम सिंह सरकारवर नाराज आहेत.
वारिस पंजाबचे प्रमुख अमृतपाल आसामच्या डिब्रूगड येथील जेलमध्ये आहेत. जेलमध्ये असताना त्यांनी लोकसभेची निवडणूक लढली आणि जवळपास २ लाख मतांनी ते निवडून आले. खासदार बनल्यानंतर ना अमृतपाल यांची जेलमधून सुटका झाली, ना त्यांना कुणी प्रतिनिधी निवडता आला, ना खासदार म्हणून काही काम करता आले यामुळे वडील तरसेम सिंग संतापले आहेत. सरकार जाणुनबुजून अमृतपाल यांना काम करण्यापासून रोखत आहे. त्यांच्या सहीचे पत्र संसदेत पाठवले जात नाहीत. कुठल्याही विभागाकडे त्यांची पत्रे दिली जात नाहीत असा आरोप वडिलांनी केला.
२३ फेब्रुवारी २०२३ रोजी वारिस पंजाब दे संघटनेने हजारोंचा मोर्चा काढून अमृतसर येथील अजनाला पोलीस ठाण्यावर हल्ला केला. या आंदोलनाचे नेतृत्व अमृतपाल सिंग करत होते. १८ मार्चला अमृतपाल घर सोडून फरार झाले. तपास यंत्रणेने १ महिना शोध घेऊन २३ एप्रिलला अमृतपाल यांना अटक केली. तेव्हापासून ते जेलमध्ये बंद आहेत. लोकसभा निवडणुकीत अमृतपाल यांनी अपक्ष निवडणूक लढवली त्यात ते जिंकून आले. ५ जुलै २०२४ रोजी खासदारकीची शपथ घेण्यासाठी अमृतपाल यांना संसदेत आणलं गेले होते. अमृतपाल स्वत:ला खलिस्तान समर्थक सांगतात.
आठवड्यातून दोनदा खासदारांशी चर्चा
अमृतपाल लोकांची समस्या कशी सोडवतात असा प्रश्न वडिलांना विचारण्यात आला, तेव्हा ते म्हणाले की, अमृतपाल यांच्याशी आठवड्यातून दोनदा फोनवरून संपर्क साधला जातो. आम्ही कुटुंबातले आहोत म्हणून बोलण्याची परवानगी आहे. मतदारसंघातील लोक आमच्याकडे येतात. दिवसाला १५-२० लोक भेटतात. आम्ही लोकांना भेटतो परंतु त्यांची कामे करू शकत नाही. जाणुनबुजून लोकांना आमच्यापासून दूर केले जात आहे. अमृतपाल याने कुठलेही काम करू नये असं सरकारला वाटतंय त्यामुळे लोक नाराज होतील. जर कामच करायला द्यायचे नव्हते मग निवडणुकीत लढायला तरी का दिले असा संतप्त सवाल अमृतपाल यांच्या वडिलांनी विचारला.
दरम्यान, जेलमधून निवडणूक लढवून जिंकणारे इंजिनिअर राशीद यांना सुविधा मिळतात पण अमृतपाल यांना नाही. काश्मीरच्या बारामुला येथील खासदार राशीद हे अमृतपाल यांच्यासारखेच अपक्ष निवडून आलेत. प्रोटोकॉलनुसार राशीद यांना सुविधा मिळत आहेत. त्यांनी खासगी सचिव नियुक्त केला आहे. परंतु अमृतपाल यांना अद्याप सुविधा दिली नाही असा आरोप अमृतपाल यांचे वकील हरजोत सिंग यांनी केला आहे.