नवी दिल्ली : पंजाबमधील खांडूर साहिबचे खासदार अमृतपाल सिंग यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतपाल सिंग यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून पावसाळी अधिवेशनात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, संसदेचे पावसाळी अधिवेशन २२ जुलैपासून सुरू होत आहे.
अमृतपाल सिंग यांनी ५ जुलै रोजी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली होती. सध्या आसाममधील दिब्रुगड तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या अमृतपाल सिंग यांनी पंजाबमधील खांडूर साहिब मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती आणि विजय मिळवला होता. यानंतर अमृतपाल सिंग यांना लोकसभा खासदार म्हणून शपथ घेण्यासाठी न्यायालयाने चार दिवसांचा पॅरोल दिला होता. तसेच, न्यायालयाने पॅरोलसाठी विशेष अटी व शर्तीही दिल्या होत्या.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत अमृतपाल सिंग पंजाबमधील खांडूर साहिब येथून अपक्ष खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी तुरुंगातूनच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि लोकसभा निवडणूक जिंकली. या निवडणुकीत अमृतपाल सिंग हे जवळपास २ लाख मतांनी विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या कुलबीर सिंग झिरा यांचा १ लाख ९७ हजार १२० मतांनी पराभव केला.
राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत तुरुंगातअमृतपाल सिंग यांना २३ एप्रिल २०२३ रोजी अमृतसर येथून अटक करण्यात आली होती. अमृतपाल सिंग सध्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत आसाममधील दिब्रुगड तुरुंगात आहेत. शांतता भंग करणे, हिंसाचार भडकावणे असे अनेक आरोप अमृतपाल सिंग यांच्यावर आहेत. तसेच, फेब्रुवारी २०२३ मध्ये अमृतपाल सिंग यांनी आपल्या साथीदारांसह पंजाबच्या अजनाला पोलीस ठाण्यावर सशस्त्र हल्ला केला होता. अपहरण आणि दंगलीतील आरोपींपैकी एकाच्या सुटकेसाठी हा प्रकार केला होता. यामध्ये सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. अमृतपाल सिंग यांच्याविरोधात त्यांच्याच एका माजी साथीदाराने तक्रार दाखल केली होती.