काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षावर (CPI) जोरदार निशाणा साधला. सीपीआय पडद्यामागून भाजपचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच वायनाडमध्ये राहुल गांधींच्या उमेदवारीबद्दल तक्रार करणारा डावा पक्ष तिरुअनंतपुरममध्ये भाजपच्या बाजूने लढत आहे, असे त्यांनी म्हटले. शशी थरूर हे तिरुअनंतपुरमधून लोकसभेच्या रिंगणात आहेत.
शशी थरूर सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणाले की, सीपीआयच्या प्रचाराचा एकमात्र परिणाम म्हणजे भाजपविरोधी मतांचे विभाजन करणे आणि वायनाडमध्ये ते युती धर्माचा प्रचार करत आहेत. थरूर विजयाचा चौकार मारणार का हे पाहण्याजोगे असेल. मागील १५ वर्षांपासून ते लोकसभेवर तिरुअनंतपुरमधून निवडून जात आहेत. यावेळी त्यांची लढाई भाजपचे केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याविरोधात आहे. सीपीआयने तिरुअनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून पन्नियान रवींद्रन यांना उमेदवारी दिली आहे.
शशी थरूर चौथ्यांदा रिंगणात
दरम्यान, २०१९ मध्ये माजी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री शशी थरूर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर ही जागा जिंकली होती. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार थरूर यांना ४,१६,१३१ मते मिळाली. थरूर यांना एकूण ४१.१५% लोकांची मते मिळाली. मागील वेळी भाजपा या जागेवर दुसऱ्या क्रमांकावर होती. पक्षाचे उमेदवार कुम्मनम राजशेखरन यांना ३,१६,१४२ म्हणजेच ३१.२६% मते मिळाली. अशाप्रकारे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ९९,९८९ मतांनी विजय मिळवला.
शशी थरूर सध्या तिरुवनंतपुरम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. ते २०१९ मध्ये तिसऱ्यांदा लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले. त्यांनी यापूर्वी केंद्र सरकारमध्ये मनुष्यबळ विकास राज्यमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. थरूर यांची संयुक्त राष्ट्रात जवळपास तीन दशकांची कारकीर्द होती. त्यामुळे ते खासदारकीचा चौकार मारणार का हे पाहण्याजोगे असेल.