इंदूर विधानसभा एकची निवडणूक अतिशय रंजक होत आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय येथून उमेदवार म्हणून उभे आहेत. तिकीट घोषणेच्या पहिल्या दिवसापासूनच कैलाश विजयवर्गीय आपल्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. मंगळवारी संध्याकाळीही कैलाश विजयवर्गीय यांनी आपल्या खास शैलीत असं काही म्हटलं जे ऐकून सर्वच जण हैराण झाले आहेत.
इंदूरमध्ये कैलाश विजयवर्गीय उमेदवार झाल्यापासून अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे असं त्यांनीच म्हटलं आहे. 3 ऑक्टोबरच्या संध्याकाळी विधानसभा एकमध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीला संबोधित करताना त्यांनी हे सांगितलं. ते म्हणाले की, "मला या विधानसभेचा उमेदवार घोषित केल्यापासून अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. आजपर्यंत मध्य प्रदेशात असा एकही अधिकारी जन्माला आलेला नाही जो माझं काम करून देणार नाही."
कैलाश विजयवर्गीय यांनी "मला तिकीट मिळाल्यापासून अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. मी काही वर्षे मध्यप्रदेशबाहेर होतो त्यामुळे मी हस्तक्षेप केला नाही, पण आता मी परतलो आहे" असं म्हटलं. तसेच "तुम्ही जेव्हा कुठे जाल तेव्हा लोक तुमचा आदर करतील आणि म्हणतील की तुम्ही कैलाश विजयवर्गीय यांच्या विधानसभेचे कार्यकर्ता आहात" असंही सांगितलं.
"काळजी करू नका, कार्यकर्त्याचा सन्मान केला जाईल. जेव्हा तुम्ही सरकारी अधिकाऱ्याला भेटता तेव्हा तो तुम्हाला आदर देईल. काम होईल, विकास होईल आणि सन्मान होईल. मी 10-12 वर्षे इंदूरच्या बाहेर होतो, त्यामुळे हस्तक्षेप केला नाही, पण आता मी इंदूरला परतलो आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, विधानसभा एकच्या कार्यकर्त्याला सन्मान मिळेल. जेव्हा तुम्ही सरकारी कार्यालयात काही कामासाठी जाल तेव्हा अधिकारी तुम्हाला आदर देईल" असं कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटलं आहे.