Narendra Modi : "काँग्रेसच्या खोटारडेपणाचा फुगा फुटला, नेते इकडे-तिकडे पळताहेत"; नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 12:41 PM2023-11-09T12:41:46+5:302023-11-09T12:47:24+5:30
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वेगवेगळ्या जिल्ह्यात निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहेत.
मध्य प्रदेशातील 240 विधानसभा जागांवर निवडणूक जिंकण्यासाठी सर्व राजकीय पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. राज्यात निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. याच दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वेगवेगळ्या जिल्ह्यात निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान आज सतना, छतरपूर आणि नीमचमध्ये प्रचार करणार आहेत. मोदी सतना येथे पोहोचले आहेत, जिथे ते रॅलीला संबोधित करत आहेत. आज भारताचा आवाज जगभरात ऐकू येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पीएम मोदी म्हणाले, "यावेळची मध्य प्रदेशची निवडणूक खूपच रंजक आहे. मतदानाला इतके दिवस बाकी आहेत पण त्याआधीच काँग्रेसच्या खोटारडेपणाचा फुगा फुटला आहे. काँग्रेसचा खोटारडेपणाच्या फुग्यातील हवा निघून गेली आहे. हारणाऱ्या काँग्रेसचे नेते इकडे तिकडे पळत आहेत आणि फक्त गोंधळ घालत आहेत. त्यांच्याकडे मध्य प्रदेशच्या विकासाचा रोडमॅप नाही."
"काँग्रेसच्या राज्यात सर्वत्र भ्रष्टाचार होता. आता जलद विकासाची आणि सर्वांच्या प्रगतीची वेळ आली आहे. भाजपा गरिबांची स्वप्ने सत्यात उतरवत आहे. काँग्रेस सरकार राज्यातील लोकांना कायमस्वरूपी घरे देण्यात अपयशी ठरलं आहे. मोदीने सर्वांना कायमस्वरूपी घरे देण्याचे आश्वासन दिले आहे" असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
रॅलीत जमलेल्या हजारोंच्या गर्दीकडे पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "मध्य प्रदेशातील सतना येथे होणाऱ्या विशाल जाहीर सभेत मला आशीर्वाद देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने येणारे माझे कुटुंबीय तीन डिसेंबरला होणाऱ्या निकालाची घोषणा करत आहेत." नरेंद्र मोदींनी याआधी देखील काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.