मुलगी झाली हो! घरी आली 'नन्ही परी' म्हणून 'या' ठिकाणी पेट्रोल पंप मालक देतोय एक्स्ट्रा पेट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 02:37 PM2021-10-15T14:37:53+5:302021-10-15T14:41:44+5:30
Daughter born petrol pump owner giving extra petrol : एका पेट्रोलपंपावर 5% ते 10% पर्यंत अधिक पेट्रोल देण्यात येत आहे.
नवी दिल्ली - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट पार कोलमडले आहे. काही ठिकाणी गेल्या दहा दिवसांत तब्बल सात वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या. पेट्रोल आणि डिझेलच्या या वाढत्या किंमतींमुळे नागरीक प्रचंड त्रस्त झाले आहेत. मात्र याच दरम्यान एका पेट्रोलपंपावर 5% ते 10% पर्यंत अधिक पेट्रोल देण्यात येत आहे. सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे म्हणून ही ऑफर नसून यामागे एक खास आहे. एका पेट्रोलपंप मालकाने ही ऑफर देऊ केली आहे.
एका कुटुंबाने मुलीच्या जन्माचा आनंद अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. घरी 'नन्ही परी' आल्याच्या आनंदात अधिकचे पेट्रोल दिले जात आहे. मध्य प्रदेशच्या बैतूलमधील एका पेट्रोल पंप मालकाने ही ऑफर दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बैतूलमधील राजेंद्र सेनानी यांच्या घरी मुलीच्या जन्माचं स्वागत करत आहेत. याच निमित्ताने त्यांच्या पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांना एस्ट्रा पेट्रोल देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुलीच्या जन्माचा सोहळा व्हावा याकरता एक्स्ट्रा पेट्रोल
राजेंद्र सेनानी यांच्या घरी 9 ऑक्टोबर रोजी भाची शिखा हिचा जन्म झाला. यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुलीच्या जन्माचा सोहळा व्हावा याकरता त्यांनी एक्स्ट्रा पेट्रोल वितरित करण्यास सुरुवात केली. याठिकाणी 13 ते 15 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 9 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते संध्याकाळी 7 पर्यंत पेट्रोल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एस्ट्रा पेट्रोल दिलं जात आहे. याठिकाणी एखाद्या ग्राहकाने 100 रुपयाचे पेट्रोल खरेदी केले तर त्याला 105 रुपयांचे पेट्रोल देण्यात येत आहे. तर 100 रुपयांपेक्षा अधिकचे पेट्रोल खरेदी केल्यावर 10 टक्के एक्स्ट्रा पेट्रोल मिळते आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.