नवी दिल्ली - फोटो किंवा सेल्फी काढायला अनेकांना आवडतो. त्यात समोर जर एखादा सेलिब्रिटी किंवा नेतेमंडळी असतील तर सेल्फी काढायचा मोह आवरतच नाही. सेल्फीवरून मध्यप्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री आणि भाजपा नेत्या उषा ठाकूर (Usha Thakur) यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. माझ्यासोबत सेल्फी काढायचा असेल तर 100 रुपये द्या असं म्हटलं आहे. अनेकदा सेल्फीमुळे त्यांना एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाला पोहचण्यास उशीर होतो. त्यामुळेच ज्याला आपल्यासोबत सेल्फी काढायचा असेल त्याला अगोदर पक्षासाठी 100 रुपयांचा निधी जमा करावा लागेल, अशी घोषणा ठाकूर यांनी केली आहे.
मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. "सेल्फीमुळे बराचसा वेळ हा वाया जातो. त्यामुळे काही वेळा लोक सेल्फी घ्यायला येतात आणि त्यातच वेळ गेल्याने कार्यक्रमांना पोहचण्यास उशीर होतो. म्हणूनच संघटनात्मक दृष्टीने आता जे कोणी आपल्यासोबत सेल्फी घेऊ इच्छितात त्यांनी भाजपाच्या पक्ष कार्यालयात 100 रुपये जमा करणं गरजेचं आहे" असं उषा ठाकूर यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या सेल्फी विधानाची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.
उषा ठाकूर यांनी फुल अथवा पुष्पगुच्छ देण्याऐवजी पुस्तक देण्याचा सल्ला दिला आहे. यापुढे आपण फुलांऐवजी पुस्तकं घेऊ असं म्हटलं आहे. याआधी 2015 मध्ये भाजपाचे नेते कुंवर विजय शाह यांनी ज्यांना आपल्या सोबत सेल्फी काढायचा आहे त्याने दहा रुपये द्या असं म्हटलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी उषा ठाकूर यांनी जनतेला एक वेगळंच आवाहन केलं होतं. कोरोना विरोधी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्यानंतर नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेत पंतप्रधान निधीमध्ये (PM Cares Fund) प्रत्येकी 500 रुपयांची मदत करावी, असं आवाहन उषा ठाकूर यांनी केलं होतं.
"कोरोना महामारीमुळे देशातील सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे हात जोडून सर्वांना आवाहन करते की कोरोना विरोधी लसीकरण पूर्ण झालेल्यांनी पंतप्रधान मदत निधीत प्रत्येकी 500 रुपयांची मदत करावी. आपल्याला माहितच आहे की एका डोसची किंमत 250 रुपये आहे. जर आपल्याला सरकारकडून कोरोनाचे दोन्ही डोस मोफत मिळत असतील तर ज्यांना शक्य आहे त्यांनी 500 रुपये मदतनिधी म्हणून देण्यास काहीच हरकत नाही. ही माझी विनंती आहे", असं उषा ठाकूर यांनी म्हटलं होतं.