नवी दिल्ली : महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळाच्या प्रकरणी दिल्ली न्यायालयाने भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना १८ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. आरोपींविरुद्ध खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
आरोपपत्राची दखल घेत अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी हरजीत सिंग जसपाल यांनी ब्रिजभूषण यांना १८ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले. भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबित सहायक सचिव विनोद तोमर यांनाही कोर्टाने समन्स बजावले आहे.पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४ (महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्यावर हल्ला करणे किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करणे), लैंगिक छळ, पाठलाग करणे आणि धमकावणे अंतर्गत १५ जून रोजी गुन्हा दाखल केला होता.