CM Shivraj Singh Chouhan: एकीकडे कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असताना दुसरीकडे काँग्रेस आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना दिसत आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला भाजप नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. देशात विष पेरायचे, पसरवायचे काम काँग्रेसने केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी तर विष पचवणारे नीळकंठ महादेव आहेत, असा पलटवार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे.
काँग्रेस विषकुंभ झाली आहे, ते सातत्याने पंतप्रधानांबद्दल विष पसरवत राहते, कधी मोदींना मौत का सौदागर म्हणतात, कोणी म्हणते सर्व मोदी चोर आहेत, कोणी म्हणते मोदीजी साप आहेत, खरे तर सत्ता हातातून गेल्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या अस्वस्थतेतून काँग्रेसकडून विषारी विधाने करण्यात येत आहेत. पण मोदीजी हे विष पिणारे नीळकंठ अर्थात महादेव आहेत, असे शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बेंगळुरूमध्ये काँग्रेसवर निशाणा साधला.
कर्नाटकला एसएमएसपासून वाचवावे लागेल
पुढे बोलताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की, कर्नाटकला एसएमएसपासून वाचवावे लागेल. एसएमएस म्हणजे सिद्धरामय्या, मल्लिकार्जुन खर्गे आणि शिवकुमार. एखादा करप्ट मेसेज मोबाईल खराब करतो, त्याचप्रमाणे हा भ्रष्ट एसएमएस कर्नाटकचे भविष्य खराब करेल. एसएमएस कर्नाटकच्या विकासासाठी धोकादायक, डबल इंजिन सरकारच कर्नाटकला वाचवू शकते. पंतप्रधान मोदीजी हे साप नाहीत, ते देशाचा श्वास आणि लोकांची आस आहेत. लोकांचा विश्वास आहे. ज्याप्रमाणे ऑक्सिजन संपूर्ण शरीराला जीवन देतो आणि उर्जेने भरतो, त्याचप्रमाणे मोदीजींनी देशाला नवसंजीवनी दिली आहे, असे कौतुकोद्गार शिवराज सिंह चौहान यांनी यावेळी बोलताना काढले.
दरम्यान, काँग्रेसने केलेल्या टीकेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही खरपूस शब्दांत समाचार घेतला. सामान्य माणसाबद्दल बोलणाऱ्या, त्यांचा भ्रष्टाचार उघड करणाऱ्या, त्यांच्या स्वार्थी राजकारणावर हल्ला करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा काँग्रेस तिरस्कार करते. या निवडणुकीतही काँग्रेसने मला पुन्हा शिवीगाळ सुरू केली आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या लोकांनी मला ९१ वेळा वेगवेगळ्या प्रकारे शिवीगाळ केली आहे. या शिव्यांच्या शब्दकोशात वेळ वाया घालवण्या ऐवजी काँग्रेसने सुशासनात एवढी मेहनत घेतली असती, तर त्यांची अवस्था इतकी दयनीय झाली नसती, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"