भोपाळ - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्याची शक्यता आहे. सोमवारी (29 ऑक्टोबर) रात्री उशिरा त्यांनी याबाबतची माहिती दिली. सध्या राहुल गांधी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. झाबुआ येथे सोमवारी (29 ऑक्टोबर) जनतेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी शिवराज सिंह चौहान आणि त्यांच्या कुटुंबीयांना टार्गेट केले. ते म्हणाले की, ''शिवराज सिंह चौहान यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्सच्या यादीमध्ये आले होते. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचेही नाव पनामा पेपर्समध्ये आले. पाकिस्तानसारख्या देशानंही त्यांची कारागृहात रवानगी केली. पण येथील मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्समध्ये येऊनही त्यांच्याविरोधात कोणती कारवाई केली जात नाही''.
याविरोधातच चौहान यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. राजकीय भाषणादरम्यान आपल्या मुलाच्या नावाचा विनाकारण उल्लेख करण्यात आल्याच्या कारणामुळे शिवराज सिंह चौहान यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात रात्री उशिरा ट्विट करत त्यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्याविरोधात मंगळवारी (30ऑक्टोबर) अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार आहे.
पुढे ते असंही म्हणालेत की, 'गेल्या कित्येक वर्षांपासून काँग्रेस माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर आरोप करत आहे. आम्ही सर्वांचा सन्मान ठेऊन मर्यादा पाळतो. मात्र आजतर राहुल गांधींनी माझ्या मुलाचं नाव पनामा पेपर्समध्ये आल्याचे सांगून सर्व सीमाच पार केल्या आहेत. याबाबत आम्ही अब्रुनुकसानीचा दावा करणार आहोत.' शिवराज यांच्या मुलानंही केलं ट्विट शिवराज सिंह चौहान यांचा मुलगा कार्तिकेय चौहाननंही राहुल गांधी यांच्या विधानासंदर्भात ट्विट करत म्हटलं की, पनामा पेपर्समध्ये माझं नाव आल्याचं खोटे विधान राहुल गांधी यांनी केले. सार्वजनिक व्यासपीठावरुन माझी आणि माझ्या कुटुंबीयांची प्रतिमा खराब करण्यात आल्यानं मी दुःखी आहे. 48 तासांच्या आत त्यांनी माफी नाही मागितली तर याविरोधात कठोर कायदेशीर कारवाईसाठी पाऊलं उचलेन.