नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीप्रमाणेच मध्य प्रदेशमधील विधानसभा पोटनिवडणुकीकड़ेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र या निवडणुकीत सर्वात लक्षवेधी लढत ठरलेल्या डबरा विधानसभा मतदारसंघात मात्र भाजपाच्या विरोधात मतदारांनी कौल दिला आहे. डबरा मतदारसंघात भाजपाकडून इमरती देवी निवडणूक लढवत होत्या. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी इमरती देवी यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे मोठा वाद झाला होता. मात्र या वादानंतरही मतदारांची सहानूभूती इमरती देवी यांना मिळू शकली नाही. याच दरम्यान आता काँग्रेसने इमरती देवींवर निशाणा साधला आहे.
काँग्रेस नेते व माजी मंत्री सज्जन सिंह वर्मा यांनी भाजपासह इमरती देवी यांच्यावर टीका केली आहे. "जर इमरती देवी यांना ‘आयटम’ संबोधल्याने काँग्रेसचे नुकसान झाले असेल, तर मग त्यांचा निवडणुकीत पराभव का झाला? इमरती देवी जिलेबी बनल्या आहेत" असं सज्जन सिंह यांनी म्हटलं आहे. पत्रकारांनी त्यांना माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या विधानामुळे मध्य प्रदेशमधील पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना वर्मा यांनी असं विधान केलं आहे.
इमरती देवी यांना त्यांचे व्याही सुरेश राजे यांनी पराभूत केले. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर त्यांच्या कट्टर समर्थक असलेल्या इमरती देवी यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. दरम्यान, आमदारकीचा राजीनामा देऊन पोटनिवडणुकीसाठी मैदानात उतरलेल्या इमरती देवी यांच्याविरोधात काँग्रेसने त्यांचे व्याही सुरेश राजे यांना मैदानात उतरवले होते. या सुरेश राजेंच्या प्रचारासाठी आले असताना कमलनाथ यांनी भाषणादरम्यान, इमरती देवी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र प्रत्यक्ष मतदानामध्ये या वादाचा मतदारांवर प्रभाव पडल्याचे दिसून आले नाही.
डबरा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या इमरती देवी यांना ६८ हजार ५६ मते मिळाली. तर काँग्रेसच्या सुरेश राजे यांना ७५ हजार ६८९ मते मिळाली. अशा प्रकारे सुरेश राजे यांनी इमरती देवी यांना ७ हजार ६३३ मतांनी पराभूत केले. इमरती देवी शिवराज सिंह चौहान सरकारमध्ये मंत्री होत्या. मात्र पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवामुळे त्यांना आता आपले मंत्रिपद सोडावे लागणार आहे. दरम्यान, मध्य प्रदेशच्या पोटनिवडणुकीत मात्र भाजपाचा बोलबाला दिसून आला. राज्यात २८ मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने १९ जागांवर विजय मिळवला.