विदिशा: शिस्त काय असते ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शिका, असा सल्ला काँग्रेस नेते दीपक बाबरिया यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी एका कार्यक्रमात खुर्च्यांवरुन गोंधळ घातला. त्यावेळी त्यांना शांत करताना बाबरिया यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्याकडून पाळल्या जाणाऱ्या शिस्तीचं उदाहरण दिलं. मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रभारी असलेल्या बाबरिया यांनी विदिशामध्ये कार्यकर्त्यांसाठी बैठकीचं आयोजन केलं होतं. बैठकस्थळी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या. मात्र शाही घराण्याचे सदस्य असलेल्या सिंधू विक्रम भवार बाना यांच्यासाठी खुर्ची नव्हती. बाना मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकीटावर लढण्यास इच्छुक आहेत. मात्र बैठकीत खुर्ची न मिळाल्यानं ते नाराज झाले. याबद्दल काँग्रेस नेते मेहमूद कामिल यांनी जिल्हा अध्यक्षांकडे तक्रार केली. यानंतर उपस्थितांमध्ये वादावादी झाली आणि बैठकस्थळी गोंधळ उडाला. त्यावेळी बाबरिया यांनी सर्वांना संघाकडून शिस्त शिकण्याचा सल्ला दिला. विशेष म्हणजे बाबरिया नंतरही त्यांच्या शब्दांवर ठाम आहेत. संघाच्या शिस्तीचं उदाहरण देण्यात काहीही गैर नाही, असं बाबरिया म्हणाले. 'पंडित नेहरुंनी ज्याप्रकारे संघाचं कौतुक केलं होतं, त्याचप्रकारे मी संघाचं कौतुक केलं आहे. चीनविरुद्धच्या युद्धावेळी नेहरुंनी मुक्तकंठानं संघाच्या शिस्तीचं स्तुती केलं होतं. जर कोणी चांगलं काम करत असेल, तर त्यांचं कौतुक करण्यात गैर काय?', असंही बाबरिया म्हणाले.
काँग्रेस नेते म्हणतात, संघाच्या स्वयंसेवकांकडून शिस्त शिका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2018 8:20 AM