भोपाळ : न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसून सेल्फी काढणं एका प्रशिक्षणार्थी पोलिसाला चांगलंच महागात पडलं. पोलीस दलात सामील होण्याची तयारी करणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसल्यास एक वर्षाचा तुरुंगवास किंवा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. शनिवारी न्यायाधीश के. पी. सिंह यांचं न्यायालय रिकामं होतं. तिथून जात असलेल्या प्रशिक्षणार्थी हवालदार राम अवतार रावत याच्या ही गोष्ट लक्षात आली. न्यायालय रिकामं दिसताच राम न्यायालयात गेला. यानंतर राम न्यायाधीशांच्या खुर्चीत बसला आणि सेल्फी काढू लागला. रामला न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेलं पाहून तिथल्या एका कर्मचाऱ्यानं त्याला हटकलं. त्यामुळे रामचा पार चढला. 'मी पोलीस आहे. त्यामुळे मला वाटेल ते मी करेन,' असं रामनं कर्मचाऱ्याला म्हटलं. यानंतर त्या कर्मचाऱ्यानं पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत राम अवतार रावत विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतलं. आपण प्रशिक्षणार्थी असून केवळ मजा म्हणून न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसून सेल्फी काढला, असं रामनं पोलिसांना सांगितलं. न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसल्यास एखाद्या व्यक्तीला एक वर्षाचा तुरुंगवास अथवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. मात्र रामची जामिनावर सुटका झाली.
न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसला अन् फसला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2018 9:59 AM