आवाज बदलून महिला प्राध्यापिका असल्याचे सांगितलं; ७ मुलींवर बलात्कार करणाऱ्याला अखेर अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 08:04 PM2024-05-26T20:04:29+5:302024-05-26T20:10:14+5:30
मध्य प्रदेशात शिष्यवृत्तीच्या नावाखाली सात विद्यार्थीनींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Crime News : मध्य प्रदेशातून हादरवणारी घटना समोर आली आहे. शिष्यवृत्तीचे आमिष दाखवून सात आदिवासी मुलींवर बलात्कार करणाऱ्या ३० वर्षीय आरोपीला मध्य प्रदेशपोलिसांनी अटक केली. आरोपीने व्हॉईस चेंजिंग ॲपचा वापर करून त्यांना शिष्यवृत्तीची ऑफर देणारी महिला महाविद्यालयाची प्राध्यापक असल्याचे दाखवले. त्यानंतर आरोपीने जंगलात नेऊन आदिवासी मुलींवर अत्याचार केले. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे.
मध्य प्रदेश पोलिसांनी याप्रकरणी आरोपी ब्रजेश प्रजापती आणि इतर दोघांना अटक केली आहे. आरोपींच्या मदतीने ब्रजेशने पहिल्या पीडितेचा फोन नंबर घेऊन तिची फसवणूक केली होती. त्यानंतर आरोपीने ॲप स्टोअरवरच्या व्हॉइस चेंजिंग ॲप्लिकेशनचा वापर केला आणि त्याच्या मदतीने आपण महिला प्राध्यापिका असल्याचे दाखवून विद्यार्थिनींना लक्ष्य केले. सर्व पीडित विद्यार्थिनी या आदिवासी समाजातील असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील आहेत. या सगळ्या प्रकारामुळे मध्य प्रदेशात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत चार पीडित विद्यार्थिनी पुढे आल्या आहेत. यासह आरोपीने आणखी तीन महिलांवर बलात्कार केल्याची कबुली दिली आहे. एका प्रकरणात आरोपीने एक विद्यार्थिीनी आणि तिच्या अल्पवयीन बहिणीला जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी त्यांच्यावर पॉक्सो कायदाही लावण्यात आला आहे. २४ मे रोजी प्रजापतीची कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी पुन्हा त्याच्या कोठडीची मागणी केली आहे.
पोलिसांच्या तपासात आरोपी हा मजूर असल्याचे समोर आलं आहे. आरोपीने यूट्यूबवर आवाज बदलण्याचं ॲप्लिकेशन कसे वापरायचे हे शिकून घेतले होते. त्यानंतर त्यान सहआरोपी राहुल प्रजापती आणि संदीप प्रजापती यांच्या मदतीने पहिल्या पीडितेचा फोन नंबर मिळवला, असे पोलिसांनी सांगितले. "आरोपीने विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे पैसे देण्याचे आश्वासन देऊन एका वेगळ्या ठिकाणी बोलावले. आपण एक महिला महाविद्यालयातील प्राध्यापक असल्याचे आरोपीने आवाज बदलून सांगितले होते. फोनवरुन बोलणाऱ्या आरोपीने विद्यार्थिनींना माझा मुलगा तुम्हाला भेटेल आणि आमच्या घरी घेऊन जाईल असे सांगितले होते. तिथेच त्यांना शिष्यवृत्तीचे पैसे मिळतील असेही सांगितले होते. त्यानंतर आरोपी पीडितेला जंगलातील एका निर्जन ठिकाणी न्यायचा. तिथे तो त्याच्या कुटुंबातील एका पडक्या झोपडीत त्यांच्यावर बलात्कार करायचा," अशी माहिती पोलिसांनी दिली.
"आरोपी पीडितेंचे फोनही घ्यायचा आणि कोणाला सांगितले तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी द्यायचा. आरोपी त्या मोबाईलमधून इतर विद्यार्थीनींचे फोन नंबर शोधत असत. तो दिवसातून १०-२० वेळा पीडितांशी बोलायचा. ज्या मुली कॉलेजला जायच्या नाहीत त्यांना जंगलात बोलवण्यासाठी सरकारी योजनांचे आमिष दाखवायचा," अशीही माहिती पोलिसांनी दिली. आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या कॉल डिटेल्सचे विश्लेषण केले आणि त्याने ज्या नंबरवर वारंवार कॉल केले होते ते पाहिले. त्यामुळे पोलिसांना इतर पीडितांना शोधण्यात मदत झाली.