Crime News : मध्य प्रदेशच्या इंदूरमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये शुक्रवारी रात्री एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या विद्यार्थ्याचा मृतदेह विचित्र अवस्थेत लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मृत्यूपूर्वी विद्यार्थ्याचा महिलेप्रमाणे मेकअप करण्यात आला होता. एखाद्या नववधूप्रमाणे, त्याच्या हातात हिरव्या बांगड्या, कपाळावर टिकली आणि साडी नेसली होती. त्याचे दोन्ही हात बांधलेले होते. विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी हा मृत्यू एका मोठ्या कटाचा भाग असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे.
भवर कुआँ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांती नगर भागातील हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. पुनीत दुबे असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. २१ वर्षीय पुनीत हा रायसेनचा रहिवासी होता. तो एमपीपीएससी परीक्षेची तयारी करत होता. पुनीत हा ३ वर्षांपासून इंदूरमध्ये राहून शिक्षण घेत होता. पुनीतच्या डोळ्यावर पट्टीही बांधली होती. मृतदेहाभोवती खूप रक्त पसरले होते. बांगड्या, टिकली लावून एखाद्या नववधूप्रमाणे तयार होऊन केलेल्या या आत्महत्येने पोलिसही कोड्यात सापडले आहे.दरम्यान, पुनीतच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
आत्महत्येच्या आदल्या दिवशी रात्री दहा वाजता पुनीतचे आईशी शेवटचे बोलणे झाले होते. सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत तो कोचिंगमध्येच असायचा. मात्र शुक्रवारी रात्रीपासून त्याचा फोन बंद होता. बराच वेळ फोन न आल्याने पुनीतच्या कुटुंबीयांनी इंदूरमधील त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर पुनीतचे मित्र आणि त्याचे नातेवाईक इंदूरमधील फ्लॅटवर पोहोचले तेव्हा दरवाजा बंद होता. दरवाजा तोडून आत पाहिले असता त्यांना पुनीतचा मृतदेह फ्लॅटमध्ये सापडला. त्यानंतर या सगळ्या प्रकाराची पोलिसांना माहिती देण्यात आली.
दरम्यान, पुनीतने आठ दिवसांपूर्वीच त्याची खोली बदलली होती. याआधी तो दोन मित्रांसोबत राहत होता. त्याच्या मित्रांनी सांगितले की पुनीत असा कधीच वागत नव्हता. पण त्याला असं पाहून खूप आश्चर्य वाटते. पुनीतच्या कुटुंबियांच्या म्हण्यानुसार त्याच्यात कधीही बदल दिसला नाही किंवा जाणवला नाही. तो नेहमी मुलांसारखेच कपडे घालत होता. पुनीतचा खून झाल्याची भीती कुटुंबीयांनी पोलिसांकडे व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.