Crime News : मध्य प्रदेशातील उज्जैनमधून अतिशय लाजिरवाणी अशी घटना समोर आली आहे. उज्जैनमध्ये आश्रममधील दोन शिक्षकांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप लावण्यात आला आहे. दोन विद्यार्थ्यांनी थेट पोलिसांकडे जात तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिक्षक आणि त्याच्या सहाय्यकाला ताब्यात घेतलं आहे. पोलीस आश्रमातील विद्यार्थ्यांकडे याप्रकरणाची अधिक चौकशी करतायत. धक्कादायक बाब म्हणजे गेल्याच वर्षी आरोपी शिक्षकाने एका बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीला मदत केली होती. त्यानंतर सर्वत्र त्याचं कौतुक होतं. मात्र लैंगिक शोषणाचा प्रकार समोर आल्यानंतर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलंय.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात उज्जैनमध्ये एका अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालकाकडून बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलगी तासभर मदतीसाठी फिरत होती. मात्र तिला कुणीही मदत केली नाही. त्यावेळी एका आश्रमातील शिक्षकाने पुढे येत त्या मुलीची मदत केली होती. त्यामुळे सर्वत्र शिक्षकाचे कौतुक करण्यात येत होतं. मात्र आता याच शिक्षकावर आश्रमतील मुलांच्या तक्रारीनंतर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला.
उज्जैनच्या महाकाल पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आश्रमात हा सगळा प्रकार घडला. या आश्रमात विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण दिलं जातं. सुट्टी असल्याने आश्रमातील मुलं आपल्या आपल्या घरी गेली होती. त्यावेळी एका अल्पवयीन मुलाने त्याच्या पालकांना त्याच्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती दिली. मुलाच्या पालकांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. त्या मुलाच्या पाठोपाठ आणखी एक मुलगा तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाला. आश्रमातील आचार्य विद्यार्थ्यांना खोलीत बोलावून त्यांचे लैंगिक शोषण करतात, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला.पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून प्रकरणाचा तपास सुरु केला. पालकांनी आश्रमातील शिक्षक राहुल शर्मा आणि सहाय्यक अजय ठाकूर यांच्याविरोधात तक्रार दिली होती.
पोलिसांनी आश्रमात जाऊन चौकशी केल्यानंतर आरोपी शिक्षक शर्मा याला अटक केली. मात्र सहाय्यक ठाकूर हा पळून गेला होता. बुधवारी रात्री त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.
उज्जैन पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्याअंतर्गत विविध कलमांखाली शिक्षक राहुल शर्मा आणि सहाय्यक अजय ठाकूर याला अटक केली आहे. दोघांनाही सध्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार गेल्या अनेक दिवसांपासून आणखी विद्यार्थ्यांसोबत अत्याचार झाले आहे. मात्र भीतीमुळे ते पुढे आलेले नाहीत. पोलिसांनी याप्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष पथक स्थापन केलं असून विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली जात आहे.