भोपाळ – मध्य प्रदेशात मागील काही दिवसांपासून सुरु असलेला सत्तासंघर्ष अखेर शुक्रवारी संपला. काँग्रेस सरकारचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी विधानसभेत बहुमत चाचणीऐवजी राज्यपालांची भेट घेतली. कमलनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकार कोसळलं.
मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या राजीनाम्यानंतर काही तासांतच मध्य प्रदेश काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक ट्विट करण्यात आलं, हे ट्विट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलं आहे. येत्या १५ ऑगस्टला मुख्यमंत्री म्हणून कमलनाथ ध्वजारोहण करतील असा दावा या ट्विटमध्ये करण्यात आला आहे. इतकचं नाही तर सध्या काही काळ विश्रांती आहे असं सांगत हे ट्विट सांभाळून ठेवा असा सल्लाही दिला आहे.
मध्य प्रदेश काँग्रेसने हे ट्विट केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. काँग्रेस आतापासूनच भाजपा सरकार पाडण्याच्या तयारीत लागलं आहे का? कमलनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस नेते बृजेंद्रसिंह राठोड यांनी सांगितले की, येणारं सरकार फक्त ६ महिने टिकेल. तसेच काँग्रेस पुन्हा एकदा मध्यप्रदेशात सरकार बनवेल असा दावा काँग्रेस नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे सध्या काँग्रेसने कमलनाथ यांना राजीनामा द्यायला सांगितला असला तरी काँग्रेस राजकीय डावपेच टाकत आहे का हे येणाऱ्या काळात कळेल.
दरम्यान, मध्यप्रदेशचे भाजपा नेते शिवराज चौहान यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री कमलनाथ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. शिवराज चौहान यांच्या नेतृत्वात भाजपाने काँग्रेस सरकार पाडलं त्याचसोबत ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपात सामील करुन घेतलं. त्यामुळे शिवराज-कमलनाथ यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली यावरुन राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
राजीनामा दिल्यानंतर कमलनाथ यांनी भाजपावर निशाणा साधला होता. कमलनाथ यांनी सांगितले होते की, भाजपाने २२ आमदारांना अपहरण केले होते, हे देशच बोलत आहे. करोडो रुपये खर्च करून हा खेळ खेळला गेला. एक महाराज आणि त्यांच्या २२ सहकाऱ्यांनी मिळून कट रचला. काही काळानंतर यातील सत्य बाहेर येईल असा आरोप त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव न घेता केला. तसेच आम्ही एकदा नाही तर तीनवेळा विधानसभेत बहुमत दाखविले होते. भाजपाने जनतेचा विश्वासघात केलाच आहे पण लोकशाहीच्या मुल्यांची हत्याही केली आहे. त्यांना जनता कधी माफ करणार नाही. भाजपा पहिल्या दिवसापासून सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप त्यांनी भाजपावर केला.