बसपा सुप्रिमो मायावतींनी खासदार दानिश अली यांना पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत पक्षातून निलंबित केले आहे. संसदेत अली हे ज्या प्रकारे काँग्रेससोबत असल्याचे दिसल्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
दानिश अली हे अनेकदा अनेक मुद्द्यांवर काँग्रेससोबत दिसत होते, तसेच काँग्रेसही अनेकदा त्यांच्या बाजुने दिसत होती. बसपाने अली यांना अनेकदा पक्ष तुमच्यासोबक असल्याचे समजाविले होते. परंतू, त्यांची काँग्रेससोबतची जवळीक काही कमी न झाल्याने मायावतींनी त्यांच्यावर कारवाई केली आहे.
भाजपा खासदार रमेश बिधुडी यांनी दानिश अली यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. यानंतर राहुल गांधी यांनी दानिश अली यांची सप्टेंबरमध्ये त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली होती. यावेळी काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल आणि खासदार प्रतापगढी देखील होते. यावेळी दानिश यांनी राहुल गांधी यांना भेटून मी एकटा नाहीय असे वाटल्याचे म्हटले होते.
राहुल गांधी माझा आत्मविश्वास वाढविण्यासाठी इथे आले होते. या गोष्टींना मनाला लावून घेऊ नका, आपल्या आरोग्याची काळजी घ्या, मला त्यांच्या बोलण्यावरून दिलासा मिळाला आहे तसेच मी एकटा नाहीय असे वाटले आहे, असे दानिश म्हणाले होते. यावरून बसपा सुप्रिमो नाराज झाल्या होत्या. बिधुडी यांनी लोकसभेत चंद्रयान ३ बाबत चर्चेवेळी दानिश अली यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरली होती. यावरून भाजपाने बिधुडींना कारणे दाखवा नोटीसही पाठविली होती. दानिश अली यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहित बिधुडी यांची सदस्यता रद्द करण्याची मागणी केली होती. काँग्रेसने देखील कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. बिर्ला यांनी बिधुडींना पाचारण करत त्यांना सक्त ताकीद दिली होती.