भोपाळ - मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मतदार आणि नागरिकांच्या गाठीभेटींवर जोर देण्यात येत आहे. मात्र, येथील काही घरांवर चक्क आमच्याकडे मते मागे नका, असे डिजीटल फलक अडकवल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, आम्ही ओपन कॅटेगिरीत आहोत, त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाने आमच्याकडे मते मागू नयेत, असा मजकूर या फलकांवर लिहिलेला आहे.
मध्य प्रदेशमध्ये 28 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांतील नेत्यांकडून मतदारसंघांचा दौरा करण्यात येत आहे. तसेच प्रचारासाठी मतदरांच्या घरी जाऊनही त्यांची भेट घेतली जात आहे. मात्र, येथील भरत नगर सवर्ण सिमितीने आपल्या घरावर अडकवलेले फलक चर्चेचा विषय ठरत आहेत. आम्ही खुल्या प्रवर्गातून आहोत. त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाने आमच्याकडे मते मागायला येऊ नये. आमचे मत नोटा (Vote For Nota) साठी असणार आहे, असे या फलकावर म्हटले आहे. याप्रकरणी तेथील स्थानिकांनी एससी आणि एसटी प्रवर्गातील आरक्षण रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच या आरक्षणाचा खुल्या प्रवर्गातील नागरिकांवर मोठ्या प्रमाणात परिमाण होतो, असेही स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आम्ही आगामी निवडणुकांमध्ये निश्चित नोटा हा पर्याय स्विकारणार आहोत, असेही तेथील नागरिकांनी म्हटले आहे. दरम्यान, भाजप नेते आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांना या मोहिमेचा त्रास होताना दिसत आहे.