भोपाळ- मध्य प्रदेशातील एका शेतकऱ्याने कर्जबाजीपणाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केली आहे. शेतकऱ्याच्या या आत्महत्येवर प्रतिक्रिया देताना मध्य प्रदेशच्या कृषी मंत्र्यांनी अत्यंत असंवेदनशील विधान केलं आहे. शेतकरी आत्महत्या ही जागतिक समस्या आहे, असं विधान मध्य प्रदेशचे कृषी राज्यमंत्री बाळकृष्ण पाटीदार यांनी केलं आहे. बाळकृष्णा पाटीदार यांच्या विधानाचा शेतकऱ्यांकडू तीव्र निषेध केला जातो आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
प्रदेशच्या सूखा गावात राहणाऱ्या लक्षण काची (वय 45) या शेतकऱ्याने शुक्रवारी विष पिऊन आत्महत्या केली. या शेतकऱ्याच्या डोक्यावर 50 हजार रुपये कर्ज होतं. गेल्यावर्षी खरीप पिकं खराब झाल्याने उत्पन्न मिळालं नाही त्यामुळे कर्जाचा बोजा सावरण्याचा प्रश्न शेतकऱ्यासमोर होता. दुष्काळामुळे रब्बीची पेरणीही करता आली नाही, अशी माहिती शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
लक्षण काची यांच्या आत्महत्येनंतर इंदूरमधील पत्रकारांनी मध्य प्रदेशात इतक्या शेतकरी आत्महत्यांची नोंद का होते आहे? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी हे धक्कादायक उत्तर दिलं आहे. 'व्यावसायिक, आयएएस-आयपीएस अधिकारी, पोलीस, सर्वसामान्य, प्रत्येक क्षेत्रातील लोक आत्महत्येच पाऊल उचलतात. हे सगळीकडेच घडतं', असं पाटीदार म्हणाले,
कृषी राज्यमंत्री बाळकृष्ण पाटीदार यांच्या या वक्तव्याचा शेतकऱ्यांकडून तीव्र शब्दात निषेध केला जातो आहे. राष्ट्रीय किसान मजदूर संघाचे अध्यक्ष शिवकुमार शर्मा यांनीही पाटीदार यांच्या वक्तव्याचा निषेध केला. शेतकऱ्यांचे मित्र असल्याचा दिखावा करणाऱ्या भाजपाचा हा खरा चेहरा आहे,अशी टीका भारतीय किसान युनियनचे राज्यसचिव अनिल यादव यांनी केली आहे.