मोदी आडनावाच्या व्यक्तींबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे गुजरातमधील एका कोर्टाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधींवर अपात्रतेची कारवाई करत त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द केलं होतं. दरम्यान, राहुल गांधी यांना आणखी एक धक्का देण्याची तयारी केंद्रातून होत आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांना सरकारी बंगला रिकामा करण्यासाठी नोटिस बजावण्यात आली आहे. लोकसभेच्या हाऊस कमिटीने ही नोटिस बजावली आहे.राहुल गांधी सध्या १२ तुघलक लेनवरील सरकारी बंगल्यात राहतात. आता राहुल गांधी यांना २२ एप्रिलपर्यंत आपला सरकारी बंगला खाली करावा लागेल. नोटिशीत करण्यात आलेल्या उल्लेखानुसार राहुल गांधी यांना अपात्रतेनंतर एक महिन्याच्या आत आपला सरकारी बंगला खाली करावा लागेल.
गुजरातमधील सूरत येथील एका कोर्टाने गुरुवारी मोदी आडनावाबाबत केलेल्या टिप्पणी प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधीं यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीसंदर्भातील ही याचिका त्यांनी २०१९ मध्ये केलेल्या एका विधानावरून दाखल करण्यात आली होती. दरम्यान, राहुल गांधी यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांचे लोकसभेचे सभासदत्व रद्द करण्यात आले होते.
या कारवाईनंतर राहुल गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, मी संसदेचा सदस्य राहिलो नाही किंवा मला तुरुंगात टाकलं तरी मी लोकशाहीसाठीची लढाई लःढत राहीन. मी घाबरणार नाही आणि माफीही मागणार नाही. कारण माझं नाव सावरकर नाही गांधी आहे आणि गांधी माफी मागत नाहीत, असं ठणकावलं होतं.