काँग्रेस आमदारांपुढे गुडघे टेकणाऱ्या, हात जोडणाऱ्या 'त्या' दोन अधिकाऱ्यांची सरकारकडून बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 02:49 AM2020-06-15T02:49:38+5:302020-06-15T07:06:03+5:30
चौहान सरकारविरुद्ध होते आंदोलन
इंदूर : आंदोलन मागे घ्या, अशी विनंती करताना काँग्रेसच्या आमदारांपुढे गुडघे टेकल्याबद्दल इंदूर शहराचे पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. मध्यप्रदेश सरकारला कोरोनाचे संक्रमण रोखण्यात आलेल्या कथित अपयशाच्या निषेधार्थ शनिवारी विरोधी पक्षाच्या आमदारांपुढे उपविभागीय दंडाधिकारी राकेश शर्मा आणि शहर पोलीस अधीक्षक डी. के. तिवारी यांनी गुडघे टेकल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यावर राज्यातील सत्ताधारी भाजपने शर्मा व तिवारी यांच्या या वर्तणुकीला आक्षेप घेतला होता.
राज्य सरकारने शनिवारी शर्मा व तिवारी यांच्या बदलीचे आदेश जारी केले. त्यांची भोपाळला तात्काळ बदली करण्यात आली, असे सरकारी अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. गुडघे टेकल्याची घटना प्रत्यक्ष पाहिलेल्याने दिलेल्या माहितीनुसार शर्मा व तिवारी शनिवारी राजवाडा भागात आंदोलनाच्या ठिकाणी गेले होते. तेथे राज्याचे माजी मंत्री जितू पटवारी, काँग्रेसचे दोन आमदार आणि दुसऱ्या एका पक्षाचा नेता धरणे आंदोलन करीत होते. शर्मा आणि तिवारी यांनी काँग्रेसच्या नेत्यांपुढे गुडघे टेकले व ते त्यांना आंदोलन मागे घ्या, अशी हात जोडून विनंती करू लागले.
राज्य सरकारला कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यात अपयश आल्याबद्दल काँग्रेसचे नेते आंदोलन करीत होते. बदली आदेशानुसार शर्मा यांची नियुक्ती उपायुक्त (सामान्य प्रशासन विभाग) आणि तिवारी यांना पोलीस मुख्यालयात उप अधीक्षकपदी नियुक्त करण्यात आले आहे.