ज्योतिरादित्य शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 02:49 PM2020-03-11T14:49:45+5:302020-03-11T18:07:12+5:30
MP Political Crisis: ज्योतिदारित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या संपर्कात असलेल्या 22 आमदारांनीही विधानसभाध्यक्षांकडे राजीनामा पाठवून दिला आहे.
नवी दिल्ली : मध्य प्रदेशमधील नाट्यमय घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे. येथील काँग्रेस सरकार कोसळण्याच्या स्थितीत आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल पक्ष नेतृत्वाकडे राजीनामा दिला. त्यानंतर आज त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, यातच ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे काँग्रेसने कधीही दुर्लक्ष केले नाही, असा दावा मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे.
"ज्योतिरादित्य शिंदे यांना मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र, त्याऐवजी त्यांना हे पद दुसर्या व्यक्तीला द्यायचे होते. कमलनाथ यांनी 'चेला' बनविण्यास नकार दिला", असे दिग्विजय सिंह यांनी सांगितले. याशिवाय, ज्योतिरादित्य शिंदे हे राज्यसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार असू शकले असते. मात्र अति महत्त्वाकांक्षी नेत्याला फक्त 'मोदी-शाह' हेच मंत्रीपद देऊ शकतात, असे दिग्विजय सिंह म्हणाले.
Jyotiraditya Scindia was offered deputy CM post in MP, but he wanted his nominee; Kamal Nath refused to accept a "chela": Digvijay Singh
— Press Trust of India (@PTI_News) March 11, 2020
ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या संपर्कात असलेल्या 22 आमदारांनीही विधानसभाध्यक्षांकडे राजीनामा पाठवून दिला आहे. त्यामुळे येथील काँग्रेसचे सरकार अल्पमतात आले आहे. याविषयी बोलताना दिग्विजय सिंह यांनी 22 मधील 13 आमदारांनी काँग्रेस सोडून जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, असा दावा केला आहे.
दरम्यान, मध्यप्रदेशमध्ये डिसेंबर 2018 पासून काँग्रेसचे सरकार आहे. मात्र सुरुवातीपासूनच काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी पाहायला मिळत होती. ज्योतिरादित्य शिंदे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असूनही त्यांना बाजूला सारण्यात आले. यानंतर त्यांना प्रदेशाध्यक्षपदही देण्यात आले नाही. त्यामुळे आपल्याला किमान राज्यसभेत पाठविण्यात यावे अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, राज्यातल्या दोन जागांसाठी मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांनी जोर लावत पुन्हा एकदा ज्योतिरादित्य शिंदे यांना साईडलाईन केले. काही दिवसांपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांच्या ट्विटर बायोमधून काँग्रेसचा उल्लेख काढला होता. तेव्हापासूनच ते काँग्रेसपासून दूर जातील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.