मध्य प्रदेशचे गृहमंत्री आणि भाजपा नेते नरोत्तम मिश्रा (BJP Narottam Mishra) हे नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. आता ही त्यांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेते नसरुद्दीन शाह आणि जावेद अख्तर यांच्यावर निशाणा साधला आहे. हे तुकडे-तुकडे गँगच्या स्लीपर सेलचे एजेंट असल्याचा गंभीर आरोप केला आहे. फक्त भाजपाशासित राज्यांमध्ये असणाऱ्या मुद्द्यांवर या तिघांकडून भाष्य केलं जात असल्याची बोचरी टीका नरोत्तम मिश्रा यांनी केली आहे.
नरोत्तम मिश्रा यांनी "शबाना आझमी, नसरुद्दीन शाह आणि जावेद अख्तर हे तुकडे-तुकडे गँगच्या स्लीपर सेलचे एंजट असून, फक्त भाजपाशासित राज्यांमध्ये घडणाऱ्या घटनांवर वाद निर्माण करतात" असा गंभीर आरोप केला आहे. बिल्किस बानो प्रकरणी आरोपींची 15 वर्षानंतर कारागृहातून निर्दोष सुटका झाल्यानंतर शबाना आझमी यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच शबाना आझमी काँग्रेसशासित राज्यांमधील मुद्द्यांवर मात्र भाष्य करत नसल्याचं म्हटलं आहे.
"राजस्थानमध्ये कन्हैय्यालालची हत्या झाली किंवा झारखंडमध्ये महिलेला जिवंत जाळलं यावर शबाना आझमी काही भाष्य करत नाहीत. तुकडे-तुकडे गँग किंवा अवॉर्ड वापसी गँगला हे अजिबात दिसत नाही. यावरुन त्यांची वाईट विचारसरणी उघड होत आहे. कोणीही त्यांना सुसंस्कृत किंवा धर्मनिरपेक्ष कसं काय म्हणू शकतं?" असा सवाल नरोत्तम मिश्रा यांनी विचारला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.