नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 5,732,519 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 91,149 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक उपाय केले जात आहेत. मास्क लावण्याचा सल्ला हा आवर्जून दिला जातो. मात्र अनेक जण कोरोनाच्या संकटात नियम पाळत नाहीत. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी मास्क संदर्भात एक विधान केल्याने वाद निर्माण झाला आहे
नरोत्तम मिश्रा यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मात्र त्यावेळी त्यांनी मास्क लावला नव्हता. पत्रकारांनी जेव्हा त्यांना आपण मास्क का लावला नाही असा प्रश्न विचारला त्यावर त्यांनी आपण अशा कार्यक्रमांमध्ये मास्क घालत नाही, त्याने काय होतं? असं उत्तर दिलं होतं. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. मिश्रा यांच्या विधानानंतर नवा वाद निर्माण झाला असून अनेकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. जोरदार टीका झाल्यानंतर आता मंत्र्यांनी यू-टर्न घेतला आहे.
"मी माझी चूक स्वीकारली असून आता मास्कचा वापर करणार"
विरोधकांनी मास्कवरून निशाणा साधल्यावर नरोत्तम मिश्रा यांनी या विधानावर माफी मागितली आहे. ट्विटरवरून त्याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मिश्रा यांनी "मी माझी चूक स्वीकारली असून आता मास्कचा वापर करणार आहे. तसेच कोरोनाच्या संकटात लोकांनी देखील मास्कचा वापर केला पाहिजे. तसेच सोशल डिस्टंसिंगचं पालन केलं पाहिजे असं मी लोकांना आवाहन करतो" असं म्हटलं आहे. तसेच याबाबतचा एक व्हिडीओही पोस्ट केला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क लावणं, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशन यासारखे खबरदारीचे उपाय केले जात आहे. मात्र अनेक ठिकाणी या सुचनांचं पालन केलं जात नाही. तसेच सोशल डिस्टंसिंगचा देखील फज्जा उडालेला दिसत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावण्याचा सल्ला दिला जातो. काही ठिकाणी मास्क न लावल्यास दंड देखील भरावा लागतो. काही दिवसांपूर्वी भाजपाच्या एका आमदाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. कोरोनावर मात केल्यावर भाजपा आमदाराला 'अत्यानंद' झाला असून मास्क न लावता मंदिरात डान्स केल्याचा व्हिडीओ समोर आला होता.
कोरोनावर मात केल्यावर भाजपा आमदाराला 'अत्यानंद', मास्क न लावता मंदिरात केला डान्स
मधू श्रीवास्तव असं या भाजपा आमदाराचं नाव आहे. त्यांनी कोरोनावर मात केली आहे. गुजरातच्या वडोदरा येथील एका मंदिरात त्यांनी मास्क न लावता डान्स केला आहे. तर त्याचवेळी भजन-कीर्तन सुरू असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. कोरोनावर मात केल्यानंतर त्यांनी आनंदाच्या भरात मंदिरात सुरू असलेल्या भजनावर डान्स केला आहे. मात्र मास्क न लावता डान्स केल्याने अनेकांनी त्यांच्यावर निशाणा साधला असून जोरदार टीका देखील केली आहे.
श्रीवास्तव यांच्या डान्स सुरू असताना मंदिरात पुजाऱ्यांसह इतरही काही लोक उपस्थित असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने मधू श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. "मी मंदिरात डान्स करतानाचा व्हिडीओ खरा आहे. मी प्रत्येक शनिवारी हे करतो. गेल्या 45 वर्षांपासून मी मंदिरात जात आहे. यात काहीही नवीन नाही. मी कोणत्याही नियमाचं उल्लंघन केलेलं नाही. सरकारने एकत्रित येण्यासाठी परवानगी दिलेली आहे. तिथे काही मोजके लोक होते. या मंदिराचा मी मालक आहे आणि मंदिरात मास्क घालणं गरजेचं नाही" असं श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
"गरीबांचं शोषण, मित्रांचं पोषण; हेच आहे मोदीजींचं शासन", राहुल गांधींचा घणाघात
लय भारी! शिक्षणमंत्र्यांकडून टॉपर्सना 'कार' गिफ्ट, विद्यार्थ्यांच्या पुढच्या शिक्षणाचाही करणार खर्च
शाब्बास पोरी! चिमुकलीने केली Google ची मदत, हटवले कोट्यवधींची कमाई करणारे स्कॅम अॅप्स
टॅप टू पे! Google Pay मध्ये आलं भन्नाट फीचर, जाणून घ्या कसा करायचा नेमका वापर?