नवी दिल्ली: मध्य प्रदेशातील इंदुरमधील बेटमा खेड्यातील लोकांनी शहिदाच्या कुटुंबासाठी जे केले त्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. या गावातील रहिवाशांनी एक मोहीम सुरू करत गुरुवारी 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी शहीद जवानाच्या कुटुंबाला नवीन घर भेट स्वरूपात दिले आहे. एएनआयने ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये गावातील रहिवाशांनी अनोख्या पद्धतीनं शहीद मोहन सिंह यांच्या पत्नीचे नवीन घरात स्वागत केले.
1992 साली आसाममध्ये पोस्टिंगला असताना मोहन सिंह यांना वीरमरण आले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा तीन वर्षांचा होता, तर पत्नी गर्भवती होती. पती शहीद झाल्यानंतर तिने खूप कष्ट करून मुलांचे पालनपोषण करत सांभाळ केला. तसेच परिस्थिती बिकट असल्याने शहीद जवानाची पत्नी व मुलं एका मातीच्या घरामध्ये राहत होते व त्या घराचे पत्रे देखील तुटलेल्या अवस्थेत होते.
त्यामुळे या कुटुंबाची परिस्थिती पाहून गावातील रहिवाशांनी कुटुंबाला मदत करण्याचे ठरविले. यासाठी त्यांनी 'एक चेक एक सही' अशी मोहीम सुरू करून 11 लाख रुपये जमा केले. तसेच गावातील रहिवाशांनी सांगितले की घर बांधण्यासाठी 10 लाखांचा खर्च झाला आहे आणि 1 लाख रुपये शहीद मोहन सिंग यांचा पुतळा बनविण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.