श्रीनगर - या पृथ्वीतलावावर जर स्वर्ग कुठे असेल तर ते जम्मू काश्मीरमध्ये असं प्रत्येक भारतीय अभिमानाने सांगतो. त्यामुळेच, जगभरातून पर्यटक जम्मू-काश्मीर फिरायला येतात. केंद्रशासित प्रदेश असलेल्या या राज्यातून मोदी सरकारने लडाखला वेगळ करत लडाख हाही स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश केला आहे. त्यामुळे, याकडे सरकारचेही अधिक लक्ष असते. येथील सौंदर्य भल्याभल्यांना भुरळ घालते. निसर्गाने नटलेली ही भूमी पर्यटनाचं महत्त्वाचं केंद्र आहे. त्यामुळेच, तेथील स्थानिकांनाही आपल्या लडाखबद्दल भावनिक आस्था आहे. त्यातूनच येथील खासदार नामग्याल जामयांग यांनी मारुती कंपनीविरुद्ध आवाज उठवला आहे.
मारुती सुझुकी कंपनीने आपल्या कारची जाहिरात करण्यासाठी लदाखचं लोकेशन निवडलं आहे. विशेष म्हणजे लदाखमधील नदीकिनारी कंपनीकडून जाहिरातीसाठीचं शुटींगही सुरू आहे. त्यावरुन, खासदार नामग्याल जामयांग यांनी संताप व्यक्त केला आहे. ''आपल्या व्यावसायिक फायद्यासाठी मारुती सुझुकी कंपनीने निसर्ग सौंदर्य नष्ट करू नये. मी प्रशासनाला शूटिंग थांबवण्याची आणि आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करण्याची विनंती करतो, लदाखचे अनोखे सौंदर्य भावी पिढीसाठी जतन करूयात, असेही खासदार जामयांग यांनी म्हटले आहे.
दरम्यान, खासदार जामयांग यांनी ट्विटरवरुन व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, मारुती कंपनीच्या कारची पाण्यातून राईड दिसत आहे. ही राईड होत असताना तेथे कॅमेऱ्यातून शुटींग होत आहे. म्हणजेच, जाहिरात करण्यासाठी या लोकेशनचा वापर करुन आपली कार एकदम भारी आणि टिकाऊ असल्याचं दाखवण्याचा हा प्रयत्न आहे, जो जाहिरातीच्या माध्यमातून केला जातो. मात्र, या जाहिरातीसाठी निसर्ग सौंदर्य नष्ट करू नका, असे जामयांग यांनी म्हटलंय.