2000 Rupees Note: भारतीय रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. पंतप्रधान मोदी यांनी नोटबंदी घोषित केल्यानंतर ५०० आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंद करून नवीन २ हजार रुपयांची नोट चलनात आणण्यात आली होती. यानंतर आता २ हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेतली जात आहे. यासाठी देशवासीयांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यावरून विरोधक केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडताना दिसत आहेत.
डिजिटल व्यवहार वाढल्यामुळे २ हजार रुपयांच्या नोटांचा वापर कमी झाला आहे. नोटाबंदीनंतर ही नोट बाजारात आली होती. आता बाजारात त्याचा ट्रेंड कमी झाला आहे. इलेक्ट्रॉनिक व्यवहारांचा प्रसार लक्षात घेता, यापुढे उच्च मूल्याच्या नोटा बाळगण्याची गरज नाही, असे वित्त सचिव टीव्ही सोमनाथन यांनी म्हटले आहे. तसेच २ हजार रुपयांची नोट चलनातून बाद झाल्याने त्याचा अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावाही सोमनाथन यांनी केला आहे. यावर आता ज्येष्ठ विधिज्ञ आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी रिझर्व्ह बँकेच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
देशात भ्रष्टाचार वाढला आहे
कपिल सिब्बल यांनी ट्विट करत काही आकडेवारी मांडली आहे. ते म्हणाले की २०१६ मध्ये १७.७ लाख कोटींची रोख चलनात होती, जी २०२२ मध्ये ३०.१८ लाख कोटी झाली. याचा अर्थ देशात भ्रष्टाचार वाढला आहे, असा दावा करत कपिल सिब्बल यांनी आता पंतप्रधान यावर काय बोलणार, असा सवाल केला आहे. तसेच ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटबंदी जाहीर करताना पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित करताना, चलनातील रोख रकमेचा थेट संबंध भ्रष्टाचाराच्या पातळीशी आहे, असे म्हटले होते. याचा उल्लेखही कपिल सिब्बल यांनी या ट्विटमध्ये केला आहे.
दरम्यान, २ हजार रुपयांची नोट वितरणातून मागे घेण्यात येत असल्याच्या निर्णयावर रिझर्व्ह बँकेचे माजी डिप्टी गव्हर्नर आर. गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेतल्यामुळे काळ्या पैशावर लगाम घालण्यास बऱ्याच प्रमाणात मदत होईल. लोक या नोटा जमा करून ठेवत होते, असे गांधी यांनी म्हटले आहे. २ हजारांच्या नोटा चलनातून मागे घेतल्याचा पेमेंटवर कोणताही पद्धतशीर परिणाम होण्याची शक्यता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.