"ममता दीदी तुम्ही प्रभू श्रीरामाचा अपमान केला, जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 03:47 PM2021-01-24T15:47:54+5:302021-01-24T15:50:20+5:30

Mamata Banerjee : रामेश्वर शर्मा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रामायणाची एक प्रत पाठवली आहे.

mp legislative assembly speaker rameshwar sharma send copy of ramayana to mamata banerjee | "ममता दीदी तुम्ही प्रभू श्रीरामाचा अपमान केला, जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही"

"ममता दीदी तुम्ही प्रभू श्रीरामाचा अपमान केला, जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही"

googlenewsNext

नवी दिल्ली - मध्यप्रदेश विधानसभेचे प्रोटेम स्पीकर आमदार रामेश्वर शर्मा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रामायणाची एक प्रत पाठवली आहे. "पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रामायणाची प्रत पाठवली आहे. अपेक्षा आहे की, ममता दीदी रामायणाचे वाचन करतील, प्रभू श्रीरामाचे चरित्र समजतील आणि य़ापुढे जय श्रीरामच्या घोषणांचा विरोध करणार नाहीत" असं त्यांनी म्हटलं आहे. रामेश्वर शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. 

"राम नामाच्या जय घोषाने ममता बॅनर्जी यांना राग येतो. ममता दीदींना माझी प्रार्थना आहे, जय श्रीराम म्हणणं त्यांनी देखील शिकावं. प्रभू श्रीरामाचा विरोध करणं बंद करा. पश्चिम बंगालमधील एका कार्यक्रमादरम्यान तुम्ही प्रभू श्रीरामाचा अपमान केला आहे. बंगालची जनता विधानसभा निवडणुकीत तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. अयोध्येत इतक्या वर्षांनंतर प्रभू श्रीरामाचे मंदिर बनत असतानाही, ममता बॅनर्जी नाराज आहेत" असं रामेश्वर शर्मा यांनी म्हटलं आहे. 

"रामाचं नाव गळ्यात गळा घालून घ्यायला हवं, गळा दाबून नाही", नुसरत जहाँ संतापल्या 

कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व्यासपीठावर भाषण करण्यासाठी जात असताना या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे नाराज होत ममता बॅनर्जी यांनी भाषण करण्यास नकार दिला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. यावेळी देण्यात आलेल्या घोषणाबाजीला ममता बॅनर्जी यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. यावरून पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. 

नुसरत जहाँ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "रामाचं नाव गळ्यात गळा घालून घ्यायला हवं, गळा दाबून नाही. स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सरकारी कार्यक्रमात अशाप्रकारच्या राजकीय आणि धार्मिक घोषणा देणाऱ्यांचा मी तीव्र निषेध करते" असं नुसरत जहाँ यांनी म्हटलं आहे. ममता बॅनर्जी यांनी देखील घोषणा ऐकल्यानंतर कार्यक्रमात काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मी निषेध म्हणून काहीही बोलणार नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. विशेष म्हणजे, ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आपली नाराजी व्यक्त केली.

Web Title: mp legislative assembly speaker rameshwar sharma send copy of ramayana to mamata banerjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.