बोअरवेलमधून पाण्याऐवजी भलतंच काहीतरी आल्याचं तुम्हाला कोणी सांगितलं. तर सुरुवातीला तुमचा विश्वासच बसणार नाही किंवा मग ते खोटं वाटेल पण हो हे खरं आहे. अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्यात बोअरवेलमधून पाण्याऐवजी दारू निघत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे पोलीसही हैराण झाले असून याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
मध्य प्रदेशात अवैध दारू आणि हुक्का बार विरोधात कारवाई सुरू आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सरकारच्या आदेशावरून पोलीस-प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. याच दरम्यान हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुना जिल्ह्यात बोअरवेलमधून दारू निघाल्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी बोअरवेल वापरून पाहिली, त्यावेळी पाण्याऐवजी दारू बाहेर येऊ लागली आणि त्यांना धक्काच बसला. अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलीस माहितीवरून कारवाईसाठी पोहोचले. पोलिसांनी बोअरवेलजवळ खोदकाम सुरू केलं. तिथे दारूने भरलेली एक टाकी सापडली. त्यात अवैध पद्धतीने दारू साठवण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू आहे. ही टाकी जवळपास आठ फूट आत होती. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात ही दारू नष्ट केली आगे तसेच अवैध दारूच्या ठिकाणांवर करण्यात आलेल्या कारवाईत जवळपास सहा हजार लीटर बनावट दारू जप्त करण्यात आली आहे.
चांचोडा पोलीस ठाण्याचे प्रभारी रवीकुमार गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, टाक्यांपासून काही अंतरावर बोअरवेल बसवण्यात आली होती. या बोअरवेलच्या सहाय्याने आरोपी जमिनीत गाडलेल्या ड्रममधून दारू काढायचे. मग ते छोट्या पिशव्यांत दारू भरून ती विकतात. जंगलात हे केलं जात होतं. पोलीस कारावाईसाठी पोहचताच आरोपी फरार झाले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"