नवी दिल्ली - काही जण फार हौशी असतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये वास्तव्यास असलेले वर्षीय प्रॉपर्टी ब्रोकर परनामंद तोलानी सातत्याने निवडणुका लढवतात. 1989 मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली. तोलानी यांनी आतापर्यंत तब्बल 17 वेळा अपक्ष निवडणूक लढवली आहे. प्रत्येकवेळी त्यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. मात्र तरीही तोलानी प्रत्येकवेळी निवडणूक लढवतात. त्यांचा हा उत्साह अद्याप कमी झालेला नाही.
परमानंद तोलानी यांनी आतापर्यंत अनेकदा लोकसभा, विधानसभा, पालिकेच्या निवडणुका लढवल्या आहेत. प्रत्येकवेळी ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवतात. यावेळी त्यांनी महापौर पदासाठी निवडणूक अर्ज दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशात महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रॉपर्टी ब्रोकर असलेले परमानंद तोलानी यावेळी महापौरपदासाठी निवडणूक लढवणार आहेत. त्यासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सकाळी 11 च्या आधी उमेदवारी अर्ज भरल्यास नक्कीच तुम्ही विजयी व्हाल, असं मला उत्तराखंडमधील ज्योतिष परखराम यांनी सांगितल्याची माहिती तोलानी यांनी दिली. ज्योतिषांच्या सांगण्यावरून मी माझा अर्ज वेळेत दाखल केला आहे. कचरा कर, संपत्ती कर यासह विविध प्रकारच्या करांमधून लोकांना दिलासा देण्यास माझं प्राधान्य असेल. मी महापौर झाल्यास एक हजार फूटापर्यंतच्या घरांना कोणताही मालमत्ता कर लागणार नाही, असं आश्वासन तोलानी यांनी दिलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.