नवी दिल्ली - देशभरात दिवाळीची धामधूम पाहायला मिळत आहे. आनंदात आणि मोठ्या उत्साहात सर्वत्र दिवाळी साजरी केली जात आहे. ऐन दिवाळीत मध्य प्रदेशच्या एका मंत्र्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेसचे नेते जीतू पटवारी यांनी खास आणि वेगळ्या शैलीत यंदाची दिवाळी साजरी केली आहे. पटवारी यांनी इंदूरच्या रेडिसन या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गरीब मुलांना जेवायला नेऊन दिवाळी साजरी केली आहे. यामुळे जीतू पटवारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या जीतू पटवारी यांनी अनाथ आणि गरीब मुलांसोबत यंदा दिवाळी साजरी केली आहे. लहान मुलांना घेऊन ते इंदूर येथील रेडिसन या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेले होते. तिथे त्यांनी गरीब आणि अनाथ मुलांना प्रेमाने जेवण भरवले. तसेच छान भेटवस्तूही दिल्या. पटवारी हे दरवर्षी मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन गरीब मुलांसोबत दिवाळी साजरी करतात. यंदाही त्यांनी अशाच पद्धतीने दिवाळी आनंदात साजरी केली आहे.
जीतू पटवारी यांचा मुलगा हॉस्टलमध्ये राहतो. दिवाळीच्या निमित्ताने मुलांने वडिलांना फोन केला होता आणि दरवर्षी प्रमाणे यंदाही आपण गरीब मुलांसोबत दिवाळी साजरी करणार आहोत का? असा प्रश्न विचारला. त्यावर पटवारी यांनी हो, नक्कीच त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणार असल्याचं मुलाला सांगितलं. त्यानंतर ते अनाथ आणि गरीब मुलांना घेऊन फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेले. यानंतर सर्वच स्तरातून पटवारी यांचा भरभरून कौतुक होत आहे.
मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्यावेळी राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी कंबर कसली होती. त्याच दरम्यान प्रचार करताना काँग्रेसचे जीतू पटवारी सोशल मीडियावर ट्रोल झाले होते. 'तुम्ही माझी काळजी घ्या, तुम्हाला माझी इज्जत ठेवायची आहे... पार्टी गेली तेल लावत', असे विधान पटवारी यांनी मतदारांशी संवाद साधताना केले. यासंबंधीचा पटवारी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होती. दरम्यान, हा व्हिडीओ स्वतः जीतू यांनी फेसबुकवर शेअर केला होता. या व्हिडीओवरुन नेटीझन्सकडून त्यांना प्रचंड ट्रोल केले. त्यानंतर यासंदर्भात स्पष्टीकरण देत असताना जीतू पटवारी यांनी माझ्या शब्दांचा चुकीच्या पद्घतीनं प्रचार केला जात आहे. क्षेत्रातील वरिष्ठ सदस्यदेखील माझ्या कुटुंबातील सदस्यासमान आहेत. भाजपाकडून माझी प्रतिमा मलिन केली जात असल्याचा आरोप केला होता. तसेच जनसंपर्कावेळी भाजपासाठी मी या शब्दांचा वापर केला होता, असेही त्यांनी सांगितले होते.