फावडं, घमेलं घेऊन ये; मीच खड्डा भरतो! रस्त्यांची अवस्था संतापलेल्या मंत्र्यांचा अधिकाऱ्यांना फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 01:06 PM2021-10-11T13:06:50+5:302021-10-11T13:12:28+5:30
रस्त्यांवरील खड्डे पाहून मंत्री संतापले; अधिकाऱ्यांची झाडाझडती
गुना: मध्य प्रदेशातील गुनामध्ये रस्त्यावर पडलेले खड्डे पाहून मंत्री चांगलेच भडकले. कारमधून प्रवास करताना खड्ड्यांमुळे होत असलेल्या त्रासाला वैतागून मंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. प्रभारी मंत्री प्रधुम्न सिंह तोमर एका खासगी कार्यक्रमासाठी गुनाला पोहोचले होते. उर्जा मंत्र्यांचा ताफा बजरंगगढ बायपास मार्गावर पोहोचताच त्यांना रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसले. रस्त्यावरून कारनं प्रवास करताना धूळ उडत होती. त्याला वैतागून मंत्र्यांनी अधिकाऱ्यांची हजेरी घेतली.
रस्त्यांवरच्या खड्ड्यांना पाहून संतापलेल्या मंत्र्यांनी त्यांचा ताफा थांबवला. त्यांना खड्ड्यांचं निरीक्षण केलं. त्यानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन केला. फावडं, घमेलं घेऊन येण्याचे आदेश त्यांनी दिले. मी स्वत:च खड्डे भरतो आणि रस्ते नीट करतो, अशा शब्दांत तोमर यांनी राग व्यक्त केला. तातडीनं रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे आदेश त्यांनी एसडीएम विरेंद्र सिंह बघेल यांनी दिले.
प्रधुम्न सिंह तोमर अनेकदा अचानक रस्त्यांची, प्रकल्पांची पाहणी करतात. याआधी अनेकदा त्यांनी अशाच प्रकारे प्रकल्पांची पाहणी केली आहे. गुना जिल्ह्याचे प्रभारी मंत्री असलेल्या प्रधुम्न सिंह तोमर यांनी काही दिवसांपूर्वी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांची हजेरी घेत त्यांची कानउघाडणी केली होती. काल तोमर यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर लगेच रस्त्यांची कामं सुरू झाली.