MP Mobile Blast :मध्य प्रदेशातून एक विचित्र अपघाताची बातमी समोर आली आहे. मोबाईल स्फोटानंतर एका तरुणाचा होरपळून मृत्यू झाला. हा तरुण शर्टच्या खिशात मोबाईल ठेवून जेवण बनवत होता. त्यावेळी तो खाली वाकला असता अचानक त्याचा मोबाईल गरम तेलाच्या कढईत पडला आणि बॅटरीचा स्फोट झाला. त्यामुळे कढईतील उकळते तेल त्याच्या अंगावर पडलं आणि तो गंभीररित्या भाजला. त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर तरुणाला ग्वाल्हेरला पाठवण्यात आलं. मात्र वाटेत असलेल्या पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असल्याने रुग्णवाहिका पुढे जाऊ शकली नाही आणि दुसऱ्या लांबच्या मार्गाने जात असताना त्या तरुणाचा मृत्यू झाला.
मृत तरुणाचे नाव चंद्रप्रकाश असे आहे. तरुणाची चूक एवढीच होती की, त्याचा मोबाईल शर्टाच्या खिशात होता आणि गॅसची शेगडी जमिनीवर ठेवली होती. जेवण बनवताना तो थोडासा वाकताच त्याचा मोबाईल तेलाच्या कढईत पडला आणि हा भीषण अपघात झाला. तेलामुळे भाजलेल्या तरुणाला कुटुंबीय रुग्णवाहिकेतून उपचारासाठी ग्वाल्हेरला घेऊन जात असताना सिंध नदीवर बांधलेल्या छोट्या पुलावर वाहतूक कोंडी दिसली. यानंतर त्यांना ८० किलोमीटर लांब प्रवास करुन ग्वाल्हेरला यावं लागलं. त्यामुळे रुग्णवाहिका रुग्णालयात पोहोचण्यास दोन तास लागले.
चंद्रप्रकाश हा त्याच्या घरी भाजी शिजवत होता. अचानक मोबाईल गरम तेलात पडला आणि त्याचा स्फोट झाला. त्यामुळे त्याचे शरीर सर्व तेल आणि आगीच्या भडक्यामुळे तो होरपळला गेला. त्यानंतर चंद्रप्रकाशला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तो वाचू शकला नाही. चंद्रप्रकाश वेळीच ग्वाल्हेरच्या रुग्णालयात पोहोचला असते तर त्यांचा जीव वाचला असता.
मृत चंद्रप्रकाशचे बुधपुरा परिसरात पंक्चरचे दुकान होते. यातून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत. मुलगी १४ वर्षांची तर मुलगा आठ वर्षांचा आहे. ही घटना घडली तेव्हा चंद्रप्रकाश याची पत्नी म्हशींना चारा घालत होती आणि तो तिला स्वयंपाकात मदत करत होता. या अपघाताबाबत फिर्यादीवरून लहार पोलीस ठाण्यात कलम ३६/२४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात मोबाईलचा स्फोट झाल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.