भोपाळ- मुलगा गोरा व्हावा, यासाठी एका पाच वर्षाच्या मुलाला दगडाने घासल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या पाच वर्षाच्या मुलाला चाइल्ड लाइन व निशातपूरा पोलिसांनी रविवारी वाचवलं. एका महिलेने उत्तराखंडमधून मुलाला दत्तक घेतलं होतं. मुलगा रंगाने सावळा असल्याने त्याला गोरं करण्यासाठी आईनेच त्याला काळ्या दगडाने घासलं.
याप्रकरणी महिलेच्या मोठ्या बहिणीने चाइल्ड लाइनला फोन करून माहिती दिली होती. यानंतर मुलाला वाचविण्यात आलं. सुधा तिवारी असं आरोपी महिलेचं नाव असून ती निशातपूरमधील सरकारी शाळेत शिक्षक आहे. सुधाने उत्तराखंडमधील मातृछाया येथून दीड वर्षाआधी मुलगा दत्तक घेतला होता. सुधाचे पती एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करतात.
मुलाला दत्तक घेऊन घरी आणल्यानंतर आरोपी महिलेची मावशी मुलाच्या रंगामुळे नाराज झाली होती. तेव्हापासून मुलाचा रंग उजळण्यासाठी ती विविध उपाय करत होती. हे सगळं सुरू असताना गेल्यावर्षी एका व्यक्तीने मुलाला काळ्या दगडाने घासण्याचा उपाय सुचवला. त्यानंतर आरोपी महिलेने मुलाला दगडाने घासायला सुरुवात केली. दगडाने घासल्यामुळे मुलाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या मनगटावर, पाठीवर व पायावर ओरखडे आले आहेत.
रविवारी पोलीस व चाइल्ड लाइनने मुलाला वाचविण्याआधी त्याला उपचाराआधी हमीदिआ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्याता आलं होतं. त्यानंतर त्याला चाइल्ड लाइन सेंटवरमध्ये चौकशीसाठी नेण्यात आलं. या मुलाला सोमवारी बाल कल्याण आयोगाच्या सदस्यांसमोर हजर केलं जाणार आहे.
आरोपी महिलेची मोठी बहीण शोभना यांनी म्हटलं की, मी सुधाला बऱ्याचदा असं कृत्य करण्यापासून थांबविण्याचा प्रयत्न केला. पण ती ऐकायच्या तयारीत नसल्याने मला तक्रार करावी लागली.