मध्य प्रदेशमध्ये महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या. ओबीसी आरक्षणानंतर ही निवडणूक झाली. यामध्ये सत्ताधारी भाजपाचे आजवर मजबूत मानले जाणारे किल्ले कोसळले आहेत. ११ पैकी सात महापालिकांवर भाजपा जिंकली असली तरी तीन महापालिका काँग्रेसने हिसकावून घेतल्या आहेत, तर एक आपने जिंकली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंची राजधानी ग्वाल्हेरदेखील आहे.
मध्य प्रदेशमध्ये वर्षभरानंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. यामुळे भाजपाला चिंतेत टाकणारी तर काँग्रेसला बळ देणारी ही निवडणूक ठरली आहे. भाजपाच्या ताब्यात इंदौर, भोपाळ, बुरहानपुर, उज्जैन, सतना, खंडवा आणि सागर या महापालिका गेल्या आहेत. तर ग्वाल्हेर, जबलपूर आणि छिंदवाडा महापालिकेवर काँग्रेसची सत्ता आली आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने एकही पालिका जिंकलेली नसली तरी अनेक ठिकाणी काँग्रेसचे गणित मात्र, बिघडविले आहे.
मध्य प्रदेशमध्ये एकूण १६ महापालिका आहेत. या सर्व पालिकांवर भाजपाचेच राज्य होते. परंतू, काल लागलेल्या निकालात चार महापालिका गमावल्या आहेत. ग्वाल्हेरमध्ये ५७ वर्षांनी भाजपाची सत्ता गेली आहे. जबलपूरमध्ये २३ वर्षांनी भाजपाचा महापौर नसणार आहे.
ग्वाल्हेर का बोचणारे...ग्वाल्हेरमधून दोन केंद्रीय मंत्री, राज्य सरकारचे पाच मंत्री येतात. एवढी सत्ता एकवटलेली असतानाही ग्वाल्हेर गमावल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. शहरी मतदारांवर भाजपाचा मोठा पगडा आहे, असे असले तरी देखील काँग्रेसचा उमेदवार जिंकल्याने आश्चर्य व्य़क्त केले जात आहे. ग्वाल्हेरच्या विजयाचे श्रेय सतीश सिकरवार यांना दिले जात आहे. त्यांची पत्नी शोभा शर्मा यांनी भाजपाच्या सुमन शर्मा यांचा पराभव केला. शर्मा या नरेंद्र सिंह तोमर यांच्या समर्थक होत्या. तर ज्योतिरादित्यांना माया सिंह यांना निवडणुकीत उतरवायचे होते. परंतू, तोमर यांनी राजकारण करून शिंदेंचा पत्ता कट केला आणि पक्षाला सुमन शर्मा यांना उतरविण्यास भाग पाडले. येत्या २० जुलैला आणखी पाच महापालिकांचे निकाल हाती येणार आहेत.