मुंबई: आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा करणाऱ्या खासदार नारायण राणेंना भाजपानं जाहीरनामा समितीत स्थान दिलं आहे. लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा ठरवण्यासाठी भाजपानं वीस सदस्यांची समिती तयार केली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह या समितीचे अध्यक्ष आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी आज भाजपानं विविध समित्यांची घोषणा केली. यामधील जाहीरनामा समितीत नारायण राणेंचा समावेश असल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याची घोषणा करणाऱ्या राणेंना भाजपाचा निवडणूक जाहीरनामा ठरवणाऱ्या समितीत स्थान कसं काय देण्यात आलं, असा प्रश्न राजकीय वर्तुळातील अनेकांना पडला. या समिती सदस्यांच्या यादीत राणे यांचं नाव 16 व्या क्रमांकावर आहे. भाजपापुरस्कृत खासदार असलेले नारायण राणेंनी गेल्या काही दिवसांपासून सतत भाजपावर टीका केली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच पुढील निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून लढवण्याची घोषणा केली आहे. मात्र आता त्यांना भाजपानं जाहीरनामा समितीत स्थान दिलं आहे. राणेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजपानं त्यांची वर्णी या समितीत लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नारायण राणेंचा समावेश असलेल्या जाहीरनामा समितीत भाजपाच्या अनेक दिग्गजांचा समावेश आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह या समितीचे अध्यक्ष आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री अरुण जेटली, निर्मला सीतारामन, थावरचंद गेहलोत, रवीशंकर प्रसाद, पीयूष गोयल, मुख्तार अब्बास नक्वी, के. जी. अल्फॉन्स, किरज रिजीजू यांच्यासह शिवराज सिंह चौहान, सुशील मोदी, केशव प्रसाद मौर्य, अर्जुन मुंढा, राम माधव, भूपेंद्र यादव, मीनाक्षी लेखी, संजय पासवान, हरी बाबू, राजेंद्र मोहन सिंह चीमा यांचा समावेश आहे.
नाराज नारायण राणेंना भाजपाकडून जाहीरनामा समितीत स्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2019 7:10 PM