नवी दिल्ली-
राज्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात पेनड्राइव्ह सादर करत सरकारवर गंभीर आरोप केले. स्टिंग ऑपरेशनचे पुरावे देत महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला. फडणवीसांनी विधानसभेत आतापर्यंत दोन पेनड्राइव्ह बॉम्ब टाकले आणि ठाकरे सरकारला हादरा दिला. त्यानंतर भाजपा आमदार नितेश राणेंनीही विधानसभेत पेनड्राइव्ह देत ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले. कोल्हापुरच्या रुग्णालयात असताना आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप नितेश राणेंनी केला. पेनड्राइव्ह बॉम्बची दहशत आता थेट दिल्लीतही पोहोचली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आज संसदेत पेनड्राईव्ह सादर करत आरोप केले आहेत. या आरोपांनी आज संसदेतही वातावरण तापलं.
खासदार नवनीत राणा यांनी एका प्रशासकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. लोकसभा अध्यक्षांनी या पेनड्राईव्हची आणि आरोपांची दखल घेतली असल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला आहे. आरती सिंह या महिला अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नवनीत राणा यांनी संसदेत केली आहे. "पेनड्राइव्ह आणि फोटोच्या माध्यमातून माझ्यावर झालेल्या अन्यायाचे मी पुरावे दिले आहेत", अशी माहिती यावेळी नवनीत राणा यांनी दिली आहे. पण आता या पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पोलीस प्रशासनाचा गैरवापर महाविकास आघाडी करत असल्याचा सतत आरोप नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याकडून होत आहे. महापालिकेतील आयुक्तांवर शाहीपेकीचा प्रकार अमरावतीत घडला होता. याच प्रकरणात नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. खासदार नवनीत राणा याच प्रकरणावरून राज्य सरकारविरोधात पुन्हा आक्रमक झालेल्या दिसून आल्या होत्या. आता पुन्हा नव्या अधिकाऱ्यावर नवनीत राणा यांनी आरोप केले आहेत.