कधी कधी मौन हेच सर्वात चांगल उत्तर असतं, असं ट्वीट करत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यापुढे आपलं उत्तर हे मौन असणार असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी मंगळवारी माध्यमांशी संवादही साधला नव्हता. दरम्यान, यावरून खासदार नवनीत राणा यांनी त्यांना टोला लगावला असून त्यांनी कायमचंच मौन धारण केलं तर शिवसेनेचंच भलं होईल, असं त्या म्हणाल्या. नवी दिल्ली येथे त्यांना माध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेवरही निशाणा साधला.
"खासदारांनाही विचारलं तर त्यांना आघाडी नको आहे. त्यांना युतीच हवीये. राऊतांनी बोलणं जर बंद केलं तर काही ना काही चांगलं शिवसेनेचं होऊ शकतं," असं राणा म्हणाल्या. "एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील सर्वात हुशार व्यक्ती आहेत. जर मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडता येत नसेल तर त्यांना मुख्यमंत्री करावं," असंही त्या म्हणाल्या.
"राऊत यांचं डोकं ठिकाण्यावर नाहीये. कधी पंतप्रधानपदी उद्धव ठाकरेंना नेणार असं म्हटलं होतं. जर पाहिलं तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रातही किती डिपॉझिट जप्त होणारे आणि नोटापेक्षा कमी मतदान त्यांना मिळेल यावर लक्ष दिलं पाहिजे. पंतप्रधानपदाच्या गोष्टी त्यांनी सोडल्या पाहिजे. कधी म्हणतात उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करू, कधी म्हणतात शरद पवारांना पंतप्रधान करू. त्यांनी आपल्या गोष्टींवर कायम राहावं आणि ते राष्ट्रवादीत आहेत की शिवसेनेत हे त्यांनी सांगावं," असं एका प्रश्नाचं उत्तर देताना त्या म्हणाल्या.
"काँग्रेसही लाचार झालीये""ज्या पद्धतीनं शिवसेना भाजपच्या नावानं सत्तेत राहिली शिवसेनेना त्यांची नाही झाली, तर काँग्रेसची कुठे होणार. काँग्रेसही इतकी लाचार झाली आहे की इतकं ऐकूनही सरकारमध्ये आहे. त्यांच्या अध्यक्षांबद्दलही वाईट बोलूनही ते महाराष्ट्रात शिवसेनेसोबत आहे. तर काँग्रेसनंही विचार केला पाहिजे की इतके वर्ष सोबत राहून शिवसेना त्यांची झाली नाही ती तुमची कुठून होणारे," असंही नवनीत राणा म्हणाल्या.