'7 दिवसांत जागा रिकामी करा...', वक्फ बोर्डाच्या नोटीसमुळे संपूर्ण गावात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 18:35 IST2025-03-07T18:32:52+5:302025-03-07T18:35:01+5:30
प्रशासनालाही याबाबत माहिती नाही; हिंदू संघटनांनी दिला आंदोलनाचा इशारा

'7 दिवसांत जागा रिकामी करा...', वक्फ बोर्डाच्या नोटीसमुळे संपूर्ण गावात खळबळ
MP News: गेल्या काही महिन्यांपासून देशभरात वक्फ बोर्डाची जोरदार चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारने वक्फ सुधारणा विधेयक आणले असून, सध्या ते पुनरावलोकनासाठी समितीकडे पाठवण्यात आले आहे. वक्फ बोर्डाने देशभरातील अनेक ठिकाणी जमिनी बळकावल्याचा आरोप आहे. अशातच, मध्य्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातून अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. येथील माखनी गावात वक्फ बोर्डाची नोटीस आल्याने खळबळ उडाली आहे.
वक्फ बोर्डाने गावातील सात कुटुंबांना त्यांची जमीन आपल्या मालकीची असल्याचा दावा केला असून, 15 दिवसांत जागा रिकामी करण्यास सांगितले आहे. जागा रिकामी न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नोटीसमध्ये देण्यात आला आहे. या नोटिशीने जबर धक्का बसलेल्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी तपासाचे आश्वासन दिले असले तरी, हिंदू संघटनांनी हा निषेध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वक्फ बोर्डाने ज्या सात कुटुंबांना नोटीस पाठवली आहे, ते या गावात पिढ्यानपिढ्या राहत आहेत. दरम्यान, ही जमीन सरकारी जमीन असून, त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मिळाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नोटीस मिळालेल्या रामकलीबाई म्हणाल्या, आम्ही आमचा जीव देवू, पण जमीन सोडणार नाही. या घटनेनंतर हिंदू संघटना सक्रिय झाल्या आहेत. संघटनांनी वक्फ बोर्डाचा दावा निराधार ठरवत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
जिल्हाधिकारी काय म्हणाले?
जिल्हाधिकारी अरुणकुमार विश्वकर्मा म्हणाले, माध्यमांद्वारे ही बाब आमच्या निदर्शनास आली आहे. वक्फ बोर्डाने कोणत्या आधारावर नोटीस बजावली, याची चौकशी केली जाईल. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेऊन योग्य ती कारवाई करू. याबाबत जिल्हा प्रशासनाला आजपर्यंत माहिती नसल्याचे मान्य केल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.