मध्य प्रदेशात निवडणुकीचे निकाल आले असून पुन्हा एकदा भाजपाचे सरकार स्थापन होणार आहे. परंतु राज्यातील शिवपुरी येथे राहणारे वृद्ध गोविंद सिंह लोधी यांच्यासाठी हा निकाल अतिशय खास होता. पिछोर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल जाहीर होताच आणि विद्यमान आमदार केपी सिंह कक्काजू यांच्या पराभवाची बातमी समोर येताच गोविंद सिंह लोधी यांना खूप आनंद झाला. गेल्या 15 वर्षांपासून ज्याची वाट पाहत होतो ती गोष्ट अखेर झाली. या आनंदात त्यांनी मुंडण केलं.
काँग्रेस नेते केपी सिंह कक्काजू शिवपुरी जिल्ह्यातील पिछोर मतदारसंघातून सलग सहा वेळा निवडणूक जिंकत होते. यावेळी त्यांनी पुन्हा त्याच जागेवरून सातव्यांदा निवडणूक लढवली. मात्र, यावेळी त्यांचे प्रयत्न फसले आणि भाजपाचे उमेदवार देवेंद्र जैन यांच्याकडून त्यांचा 40 हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला. केपी सिंह यांचे उद्दाम वागणे आणि जनतेबद्दलची उदासीनता हे त्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण मानले जात आहे.
आनंदाने केलं मुंडण
गोविंद सिंह लोधी यांना पराभवाचा प्रचंड आनंद झाला. केपी सिंह हरल्याबरोबर ते आनंदात नाचू लागले आणि नंतर मुंडण देखील केलं. यामुळे परिसरातील लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. गेल्या 15 वर्षांपासून या वेळेची वाट पाहत असल्याचे या वृद्धाने सांगितलं. शेवटी देवाने त्यांचं ऐकले आणि ती वेळ आली ज्याची ते खूप वर्षांपासून वाट पाहत होते.
नेमकं काय घडलं होतं?
पिछोरच्या जराय गावातील रहिवासी गोविंद सिंग लोधी सांगतात की, 2008 मध्ये त्यांच्या भावाचा अपघातात मृत्यू झाला. यानंतर एका महिलेने आपल्या मृत भावाच्या मालमत्तेचा गैरवापर करून ती तिच्या नावावर करून घेतली होती. याप्रकरणी कारवाई करण्यासाठी ते आमदार केपी सिंह यांच्या निवासस्थानी पोहोचले.
आमदाराने मारली होती कानशिलात
या वृद्ध व्यक्तीचा आरोप आहे की, खोलीत प्रवेश करताच आमदाराने त्यांना विचारले की तुम्ही कुठून आला आहात. आपण जराय गावातून आल्याचं सांगताच त्याचा अर्ज फाडून कानशिलात लगावली आणि तेथून जाण्यास सांगितलं. वृद्धाच्या म्हणण्यानुसार, या घटनेमुळे ते खूप दुखावले गेले. त्यानंतर त्यांनी शपथ घेतली की ज्या दिवशी आमदार केपी सिंह निवडणूक हरतील, त्या दिवशी आनंदाने मुंडण करतील.