संतोष ठाकूर
नवी दिल्ली : मध्यप्रदेशात काँग्रेस सरकारमध्ये बंड अचानक झालेले नाही. ज्योतिरादित्य शिंदे यांचा पवित्रा आणि लक्ष्य यांचे आकलन करुन भाजपने दोन महिन्यांपूर्वीच एम २ प्लान तयार करणे सुरु केले होते. यातील एक महाराष्ट्र आहे तर, दुसरा मध्यप्रदेश. महाराष्ट्रात भाजप उद्धव ठाकरे यांना एनडीएत परत आणण्यासाठी संघ आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आधारे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. तथापि, ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आधारे मध्यप्रदेशात आपले सरकार स्थापन करण्यासाठीच्या मोहीमेत भाजप दोन महिन्यांपासून सक्रीय आहे. त्याचाच एक भाग म्हणून मध्यप्रदेशातील भाजपचे मोठे नेते आणि केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या माध्यमातून शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्याशी भाजपने चर्चा केली तेव्हा शिंदे यांनी सांगितले की, जर त्यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद आणि राज्यसभा देण्यात आली नाही तर त्यानंतर आपण भाजपमध्ये जाण्याबाबत काही निर्णय घेऊ. आता भाजपने जेव्हा हे पाहिले की, शिंदे यांची इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा त्यांनी आपल्या एम २ मोहिमेला वेग दिला.
सूत्रांनी सांगितले की, भाजप आणि शिंदे यांच्यात झालेल्या चर्चेनुसार, त्यांना असा प्रस्ताव देण्यात आला की, जर ते १५ आमदार घेऊन आले तर त्यांना राज्यसभा सदस्यत्वासह कॅबिनेट मंत्रीपद दिले जाईल. त्याशिवाय त्यांच्यासोबत येणाऱ्या आमदारांपैैकी काही आमदारांना राज्यात बनणाºया नव्या सरकारमध्ये समाविष्ट करण्यात येईल. याशिवाय भाजप जिंकत असलेल्या राज्यसभेच्या एक जागेसह अन्य एक जागा जिंकण्यासाठीही भाजप प्रयत्न करेल. यात काँग्रेसचा सध्या दोन जागांवर विजय होत आहे. त्यांना केवळ एका जागेवरच समाधान मानावे लागेल.
भाजपा एकीकडे काँग्रेसमधील फुुटीची प्रतीक्षा करत आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसकडून आपले आमदार फोडण्याच्या प्रयत्नांबाबतही सतर्क आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या सर्व आमदारांची बैठक मंगळवारी भोपाळमध्ये ठेवली आहे. यात मध्यप्रदेशातील भाजपचे सर्व संसद सदस्यही उपस्थित राहतील. आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवण्याबाबतही चर्चा होईल. १६ मार्च रोजी विधिमंडळाचे अधिवेशन आहे. शक्तीपरिक्षणाबाबतही रणनीती आखली जात आहे.ज्योतिरादित्य शिंदे आणि अमित शहा हे क्रिकेटच्या राजकारणाशी जोडलेले आहेत. यामुळे त्यांच्यात परस्पर संबंधही आहेत. मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकारचा ड्रामा सुरु झाला तेव्हा दोन्ही नेत्यांमध्ये याबाबत चर्चाही झाली. अमित शहा यांनी शिंदे यांना सांगितले की, त्यांच्याशिवाय समस्त शिंदे परिवार भाजपमध्ये आहे. अशावेळी त्यांचे येणे म्हणजे परिवारात येण्यासारखे होईल.