इंदूर - मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोमवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक बोलावली, या बैठकीत कमलनाथ यांनी सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले आहेत. काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे पक्षावर नाराज असल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळे शिंदे समर्थक आमदार भाजपात प्रवेश करणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
राजकीय हालचाली दरम्यान मंगळवारी भाजपाने विधानसभेतील आमदारांची बैठक बोलावली आहे. यात शिवराजसिंह चौहान यांची गटनेते म्हणून निवड होण्याची दाट शक्यता आहे. राज्याचे प्रभारी महासचिव विनय सहस्रबुद्धे हे सुद्धा भोपाळला जाणार आहेत. दुसरीकडे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मंगळवारीच भाजपाच्या संसदीय बोर्डाची बैठक बोलावली आहे. भाजपातर्फे मध्य प्रदेशातील भावी मुख्यमंत्र्यांच्या नावावर उद्या सायंकाळपर्यंत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक समिती आणि संसदीय बोर्डाची बैठक होऊ शकते.मंगळवारी ज्येतिरादित्य शिंदे यांचे वडील माधवराव शिंदे यांची जयंती आहे. त्यामुळे मंगळवारी शिंदे समर्थकांसमोर आपल्या भविष्यातील रणनीतीची घोषणा करतील, अशी शक्यता आहे. मध्यप्रदेशचे गृह मंत्रीपद मला दिले जावे या अपक्ष आमदार सुरेंद्र सिंह शेरा यांनी केलेल्या मागणीवर गृहमंत्री बाला बच्चन यांनी मी तशी शिफारस करायला तयार आहे, असे सोमवारी म्हटले. बच्चन वार्ताहरांशी बोलताना म्हटले की, राज्यात सरकारमध्ये मंत्रीपद देण्याचे काम काँग्रेस पक्ष श्रेष्ठी आणि मुख्यमंत्री कमलनाथ यांचे आहे. परंतु, शेरा हे माझे चांगले मित्र आहेत व त्यांना कोणत्याही पदासाठी माझ्या शिफारशीची गरज असेल तर मी स्वत: ती करीन. ते म्हणाले, शेरा मंत्री व्हावेत किंवा आणखी कोणत्या मोठ्या पदावर जावेत तरीही आम्ही जुने मित्र या नात्याने एकत्र काम करीत राहू. कमलनाथ सरकारमध्ये गृह मंत्री बनवले जाण्याची अनेक दिवसांपासून मागणी करीत असलेले शेरा नुकत्याच बेपत्ता झालेल्या आमदारांत समाविष्ट होते. अपक्ष निवडून आलेले शेरा कमलनाथ सरकारला पाठिंबा देत शनिवारी भोपाळला परतले.
दरम्यान, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सांगितले की, आम्ही ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची तब्येत ठिक नसल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे शिंदे यांच्याशी जास्त बोलणं झालं नाही. पण जो खरा काँग्रेसी आहे तो काँग्रेसमध्येच राहील असंही त्यांनी सांगितले.