नवी दिल्ली - जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना, भारतातही कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बचावासाठी चार टप्प्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. आता, लवकरच लॉकडाऊनचा पाचवा टप्पाही सुरु करण्यात येईल, असे दिसून येते. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार असल्याचे समजते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेतेमंडळीही काळजी घेत आहे. मात्र, काही नेत्यांनाही कोरोनाने ग्रासले आहे. आता, भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना दिल्लीतीलएम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भोपाळ मतदारसंघातील खासदार आणि भाजपा नेत्या प्रज्ञा ठाकूर यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देशात लॉकडाऊन असल्यामुळे त्या दिल्लीतच अडकून बसल्या होत्या. मात्र, भोपाळ मतदारसंघात त्यांचे पोस्टर्स झळकविण्यात आले. खासदार गायब अशा आशयाने त्यांचे पोस्टर्स त्यांच्या मतदारसंघात झळकल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर, दुसऱ्या दिवशीच त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आरोग्य अत्यवस्थतेमुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्या दिल्लीतच राहत आहे. मात्र, भोपाळमध्ये पोस्टर्स झळकल्यानंतर, त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून रुग्णालयात दाखल असून प्रकृती उत्तम नसल्याचे म्हटले आहे. एका डोळ्याने दिसत नसून दुसऱ्या डोळ्यानेही अंधुकपणेच दिसत असल्याचं प्रज्ञा यांनी म्हटलंय.
प्रज्ञासिंग यांच्या मेंदूपासून पायापर्यंत शरीरावर सूज असून डॉक्टरांनी कुणाशीही बोलण्यास मनाई केली आहे. लॉकडाऊन काळात मी दिल्लीत आहे, पण मतदारसंघात माझ्या टीमचं काम सुरुच आहे. तरीही, काँग्रेस नेत्यांकडून जाणीवपूर्वक पोस्टरबाजी करण्यात आल्याचा आरोप ठाकूर यांनी केला आहे. मी ज्या शारिरीक व्याधाने आजारी आहे, ती काँग्रेसच्या कार्यकाळात सरकारकडून देण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं.