नराधमांनी चिमुरडीवर अत्याचार केला, तिचा छळ करून अर्धनग्न अवस्थेत सोडून दिले. अंगावर काटा आणणारी दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. ही हृदयद्रावक अन् संतापजनक घटना मध्य प्रदेशातील उज्जैन येथे घडली. या घटनेने अवघ्या देशाच्या डोळ्यात पाणी आणलं. १५ वर्षीय चिमुकलीवर नराधमांनी अत्याचार केल्यानं संपूर्ण देश हादरला. एवढंच नाही तर आरोपींची क्रूरता एवढी की पीडित तरूणी ८ किलोमीटर नग्न अवस्थेत कपड्यांच्या शोधात फिरत राहिली. पण, दुर्दैव असं की कोणीच तिला आसरा दिला नाही. अखेर तिनं राहुल शर्मा नावाच्या पुजाऱ्याकडं मदत मागितली अन् तो पुजारी तिच्यासाठी देवदूत बनला. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार असून विरोधक सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
उज्जैन येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार म्हणजे माणुसकी कशी संपत आहे, हे दिसत असल्याचे चतुर्वेदींनी सांगितले. वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना प्रियंका चतुर्वेदीं म्हणाल्या, "हा केवळ बलात्काराचा मुद्दा नसून माणुसकी कशी संपत आहे, हाही मुद्दा उपस्थित झाला आहे. यावरून आपण किती असंवेदनशील झालो आहोत हे दिसून येते. ज्या चिमुरडीसोबत एवढी लज्जास्पद घटना घडली त्या लहान मुलीच्या मदतीसाठी आम्ही पुढे येत नाही हे अमानवीय आहे. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात गेले पाहिजे आणि आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे."
दरम्यान, या प्रकरणी उज्जैन पोलिसांनी रिक्षा चालकासह पाच आरोपींना अटक केली आहे. उज्जैनचे एसपी सचिन शर्मा यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. नग्न अवस्थेत फिरलेल्या पीडितेला आता अनेकजण मदत करत आहेत. अशातच महाकाल पोलीस ठाण्यातील अधिकारी अजय वर्मा यांनी माणुसकीचे दर्शन दाखवले. खरं तर त्यांनी पीडित मुलीला दत्तक घेणार असल्याचे सांगितले आहे. तसेच तिच्या शिक्षणाचा आणि संगोपनाचा संपूर्ण खर्च ते करणार आहेत.
देवदूत पुजाऱ्याने सांगितली आपबीती पीडित तरूणी नग्न अवस्थेत फिरत असताना मदतीला आलेल्या देवदूत पुजाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी त्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती, पण तिला बोलता देखील येत नव्हतं. त्याने तिला नाव विचारले, कुटुंबीयांबद्दल विचारले, तिला इथे सुरक्षित असल्याचा विश्वास दिला. तो तिची माहिती विचारत होता परंतु ती खूप घाबरली होती. दरम्यान, कोणीही आले तरी ती खूप घाबरायची. पोलिसांना पाहून पीडितेच्या तोंडून शब्द देखील फुटत नव्हता.