नवी दिल्ली - भाजपाचे काही नेतेमंडळी आपल्या वादग्रस्त विधानांसाठी लोकप्रिय आहेत. याच दरम्यान आणखी एक नेते आपल्या विधानामुळे आता चर्चेत आले आहेत. "महात्मा गांधी यांच्या चुकीमुळेच देशाची फाळणी झाली" असं विधान मध्य प्रदेश विधानसभेचे प्रोटेम स्पीकर व भाजपा नेते रामेश्वर शर्मा यांनी केलं आहे. शेतकरी सन्मान कार्यक्रमात शर्मा यांनी हे विधान केलं. रामेश्वर शर्मा यांच्या या विधानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. तसेच भाजपा नेत्याच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. रामेश्वर शर्मा यांनी दिग्विजय सिंहांबाबतही विधान केलं आहे. तसेच "दिग्विजय सिंह यांचं काम आणि व्यवहार मोहम्मद अली जिनांपेक्षा जास्त धोकादायक आहे" असं म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळमधील गांधी नगर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमासाठी रामेश्वर शर्मा हे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शर्मा यांनी भारताच्या फाळणीसाठी महात्मा गांधींना जबाबदार धरलं आहे. रामेश्वर शर्मा यांनी "काय आहे… नावामुळे गैरसमज तयार होतात. दिग्विजय सिंह यांचं काम आणि व्यवहार मोहम्मद अली जिनांपेक्षा जास्त धोकादायक आहे. आधी जिनांनी देशाचं विभाजन केलं. 1947 मध्ये बापूंकडून चूक झाली आणि देशाचे दोन तुकडे पडले. तसं विभाजन सिंह करत आहेत" असं म्हटलं आहे.
रामेश्वर शर्मा याआधीही अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेस नेत्यांविरुद्ध विधान केलं होतं. "दगडफेक करणाऱ्यांचं काँग्रेस समर्थन करत असेल, तर त्यांनी समोर यावं. काँग्रेसने दगडफेकीच्या घटनांची जबाबदारी घ्यायला हवी. राज्यातील सामाजिक सौहार्द खराब करण्याची परवानगी कोणालाच नाही. त्यामुळेच सरकार कडक कायदे करण्यावर काम करत आहे" असं म्हटलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे नावाने ज्ञानशाळा उघडण्याची घटना घडली आहे.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये ‘गोडसे ज्ञानशाळा’ सुरू; हिंदू महासभेने केलं भव्य आयोजन
मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे गोडसे ज्ञानशाळेचं उद्धाटन करण्यात आलं आहे. या ज्ञानशाळेत गोडसे यांची विचारधारा युवकांना शिकवण्यात येईल. महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत मध्य प्रदेशातील शिवराज सरकारनेही या कार्यक्रमावर कोणतीही कारवाई केली नाही. गोडसे ज्ञानशाळेत नथुराम गोडसे यांच्या नावाने जयजयकार करण्यात आला. तसेच उद्धाटनावेळी उपस्थित पाहुण्यांनी नथुराम गोडसेच्या देशभक्तीबद्दलचे किस्से लोकांना सांगितले. नथुराम गोडसे हिंदू महासभेचे जोडले गेले होते, कार्यक्रमात नथुराम गोडसे यांच्यासोबत अनेक महापुरुषांचे फोटोदेखील जोडण्यात आले, ग्वाल्हेरच्या दौलतगंज परिसरात हिंदू महासभेच्या कार्यालयात ही कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे.
हिंदू महासभेने नथुराम गोडसेसोबत महाराणा प्रताप, महाराणी लक्ष्मीबाई, गुरू गोबिंद सिंह आणि लाला लजपत राय यांच्या प्रतिमाही लावल्या होत्या. मध्य प्रदेश आणि नथुराम गोडसे वादाचं सत्र अनेक वर्षापासून सुरू आहे, हिंदू महासभा ग्वाल्हेरमध्ये दरवर्षी नथुराम गोडसे जयंती साजरी करते, दोन वर्षापूर्वी भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा यांनी गोडसेला देशभक्त बोलल्याने वाद झाला होता, त्यानंतर साध्वी प्रज्ञा यांना संसदेत माफी मागावी लागली होती. यावेळी हिंदू महासभेचे उपाध्यक्ष जयवीर भारद्वाज यांनी विधान केले की, या देशाचे कुणीही विभाजन करण्याचा प्रयत्न केला तर हिंदू महासभा त्याला प्रखरतेने विरोध करेल, ठोस उत्तर देईल, इतकचं नाही तर हिंदू महासभेकडून पुन्हा एकदा नथुराम गोडसे निर्माण करण्यात येईल असा इशारा दिला.