मध्य प्रदेशातील रीवा येथील एका खासगी शाळेत धक्कादायक घटना घडली आहे. एका म्यूझिक टीचरने 12 वर्षांच्या विद्यार्थ्याला एवढ्या जोरात कानाखाली मारली की मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असून, त्याला सध्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. कुटुंबीयांनी उपचारासाठी आतापर्यंत तीन शहरं बदलली आहेत. पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस फरार आरोपी शिक्षकाचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अमहिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनार्दन कॉलनी येथील भास्कर हायर सेकेंडरी स्कूलचं आहे. येथे 28 ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे 12 वर्षांचा विद्यार्थी त्याच्या वर्गात बसला होता. दरम्यान, म्यूझिक टीचर वर्गात आले, मात्र काही कारणास्तव विद्यार्थ्याला उभं राहता आलं नाही. या गोष्टीमुळे शिक्षक ऋषभ पांडे नाराज झाले आणि रागाच्या भरात त्याने विद्यार्थ्याला जोरदार कानाखाली मारली. यामुळे मुलाला दुखापत झाली.
मारल्याने डोक्याला दुखापत झाली. मुलाचे डोळे सुजले आणि तो रडत घरी पोहोचला. जिथे आईने विचारले असता त्याने संपूर्ण घटना सांगितली. औषध दिल्यानंतर तीन दिवसांनी विद्यार्थ्याला खूप ताप आला आणि त्याची प्रकृती चिंताजनक झाली. त्यानंतर त्याला तातडीने संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. विद्यार्थ्याच्या एमआरआय आणि सीटी स्कॅन रिपोर्टमध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे.
विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर होत चालल्याने न्यूरोसर्जनने त्याला जबलपूरला रेफर केलं. त्यांच्यावर जबलपूर मेडिकल कॉलेजमध्ये काही दिवस उपचार सुरू होते मात्र त्यात काहीच सुधारणा होत नव्हती. त्यानंतर विद्यार्थ्याला नागपूरला रेफर करण्यात आले. डॉक्टरांनी 11 सप्टेंबर रोजी डोक्यावर शस्त्रक्रिया करून विद्यार्थ्याचा जीव वाचवला. विद्यार्थ्याला सध्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.