देशाच्या पहिलं वर्ल्ड क्लास रेल्वे स्थानक हबीबगंजचं (Habibganj Railway Station) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यावरुन आता रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरुन राजकारणाला सुरुवात झाली आहे. मंत्री जयभान सिंह पवैया यांच्यानंतर आता भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनीही आता हबीबगंज रेल्वे स्थानकाला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याची मागणी केली आहे. याबाबतच एक ट्विट साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलं आहे.
भोपाळ लोकसभा मतदार संघात येणाऱ्या हबीबगंज रेल्वे स्थानकाच्या उदघाटनासाठी पंतप्रधा नरेंद्र मोदी येणार हे शुभसंकेत आहेत. रेल्वे स्थानकाचं नाव बदलून अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव स्थानकाला देण्याची घोषणा पंतप्रधान मोदी करतील असा विश्वास आहे, असं प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या.
मध्य प्रदेशचे सूचना आयुक्त विजय मनोहर तिवारी यांनीही याआधीच हबीबगंज रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी केली होती. ज्यापद्धतीनं फैजाबादचं अयोध्या नामकरण झालं, त्याच पद्धतीनं मध्य प्रदेशातील हबीबगंज स्थानकाचंही नाव बदलण्यात यावं, असं तिवारी म्हणाले होते.
भोपाळचं हबीबगंज रेल्वे स्थानक हे देशातील पहिलं वर्ल्डक्लास रेल्वे स्थानक म्हणून ओळखलं जाणार आहे. एखाद्या एअरपोर्ट प्रमाणं स्थानकाची निर्मिती कऱण्याची आली आहे. यात पार्किंगपासून ते हॉटेल्स वगैरे सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत. हबीबगंज रेल्वे स्थानकाचं नाव हबीब मियाँ यांच्या नावावरुन ठेवलं आहे. याआधी या रेल्वे स्थानकाचं नाव शाहपूर होतं. हबीब मियाँ यांनी १९७९ रोजी स्थानकाच्या विस्तारासाठी आपली जमीन दान केली होती. त्यानंतर या रेल्वे स्थानकाचं नाव हबीबगंज असं ठेवण्यात आलं होतं.