Sanjay Raut On Kangana Ranaut : बॉलिवुड अभिनेत्री आणि हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आलेल्या कंगना रणौतवर गुरुवारी हल्ला झाला. दिल्ली एनडीच्या बैठकीसाठी येत असताना चंदीगड विमानतळावर कंगना रणौतला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महिला जवानाने कानाखाली मारल्याचे समोर आलं. कंगनाने याविरोधात विमानतळ पोलिसांकडे कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानतंर कंगनाला कानाखाली मारणाऱ्या कुलविंदर कौरला निलंबित करण्यात आलं. या सगळ्या प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला कंगना रणौतबद्दल सहानुभूती आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं.
अभिनेत्री कंगना रणौत मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकल्यानंतर सक्रिय राजकारणी म्हणून काम करण्यास सज्ज झाली आहे. मात्र गुरुवारी दिल्लीला जात असताना चंदिगड विमानतळावर तिला एका महिला जवानाने कानाखाली मारली. यानंतर कंगना रणौतने तक्रार केल्यावर कुलविंदर कौरलाला ताब्यात घेण्यात आले आणि तिला नोकरीवरून निलंबित करण्यात आले. चौकशीदरम्यान कुलविंदर कौरने सांगितले की, शेतकरी आंदोलनादरम्यान कंगना रणौतच्या वक्तव्यामुळे ती दुखावली गेली होती. या घटनेवरुन संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी या प्रकरणावर भाष्य केले. काही लोक मतदान करतात तर काही लोक कानाखाली मारतात. खरंच काय झालं ते मला माहीत नाही. मी या प्रकरणात लक्ष घालेन आणि नंतर बोलेन, असं संजय राऊत म्हणाले. त्यानंतर पत्रकारांनी घडलेला प्रकार संजय राऊत यांना सांगितला. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की," त्या महिला शिपाईने सांगितलं की तिची आई शेतकरी आंदोलनात सहभागी होती. त्यामुळे आपल्या आईबाबत कुणी चुकीचं बोललं असेल राग येणं स्वाभाविकच आहे. पण खरं तर कोणीही कायदा हातात घेऊ नये. मात्र, त्या महिला शिपाईने आपल्या आईसाठी कायदा हातात घेतला. भारत माता तिची आई आहे आणि जे शेतकरी आंदोलनात बसले होते ते भारत मातेचे पुत्र होते. त्यामुळे जर कोणी भारत मातेचा अपमान केला असेल आणि त्यामुळे कोणाला राग आला असेल, त्याचा आपण विचार करायला हवा."
"मला कंगना रणौतबद्दल सहानुभूती आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्यामुळे अशाप्रकारे खासदारांवर कोणीही हात उगारू नयेत. मात्र, त्याचवेळी शेतकऱ्यांचा सन्मानही राखला गेला पाहिजे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत अजूनही लोकांमध्ये किती संताप आहे हे या घटनेवरून दिसून येते," असेही संजय राऊत म्हणाले.