काँग्रेस खासदार शशी थरूर यांचा गुरुवारी एक छोटासा अपघात झाला. संसदेत पायऱ्यावरुन चालत असताना त्यांचा पाय लचकला आणि प्रचंड वेदना सुरू झाल्या. यानंतर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले. सध्या त्यांच्या पायाला प्लास्टर लावले असून, ते दिल्लीतच आराम करत आहेत. त्यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली.
अपघातानंतर शशी थरूर आज संसदेच्या कार्यवाहीला हजर राहू शकले नाही. तसेच, त्यांनी आपल्या मतदारसंघाचा दौराही रद्द केला आहे. ट्विटरवर त्यांनी आपल्या अपघाताची माहिती देताना सांगितले की, संसदेत पायऱ्यावरुन उतरत असताना एक पायरी मिस झाली आणि पाय लचकला. सुरुवातीला मी दुर्लक्ष केले, पण नंतर चालताही येत नव्हते, अशी माहिती त्यांनी दिली.
या ट्विटसोबत थरूर यांनी दोन फोटोही शेअर केले आहेत, ज्या ते रुग्णालयातील बेडवर झोपलेले दिसत आहेत. दरम्यान, शशी थरूर केरळच्या तिरुवनंतपुरममधून काँग्रेसचे खासदार असून, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवल्यामुळे ते चर्चेत आले होते.